Rajan Vichare News Sarkarnama
मुंबई

Thane politics : देवीच्या मांडवातच राजन विचारेंनी शाब्दिक त्रिशूल उगारला !

Amol Jaybhaye

Thane News : देवीच्या दरबारात कोणी कोणाचा आवाज दाबू शकत नाही. कोणाच्या मालकीचा दरबार नाही. देवीच्या दरबारात जर कोणी असे करत असेल, तर त्या राक्षसाचा वध केल्याशिवाय राहणार नसल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी केली. विचारे यांनी गुरुवारी टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेत महाआरती केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नवसाला पावणारी आणि भक्ताच्या हाकेला धावणारी असा या देवीचा महिमा आहे. देवीकडे मागावे लागत नाही. ती न मागता सर्वकाही देत असते, त्यात समाधान मानायचे असते. मात्र, एखाद्याला सर्वकाही देऊनही त्याचे समाधान होत नसेल, त्याला काही करू शकत नसल्याची टीका खासदार विचारे यांनी केली. दसरा मेळाव्यावरून त्यांना छेडले असता, शिवसेना पक्षाचा जन्म ५७ वर्षांपूर्वी झाला.

प्रबोधनकार ठाकरे त्यावेळी होते, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यावेळी छोटे होते, मराठी लोकांच्या न्याय हक्कासाठी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्त्वावर या संघटनेची निर्मिती झाली. किती आले किती गेले, आज शिवसेना आहे तिथे आहे, उलट संघटना दहा पटीने वाढली आहे. संघटनेचा जन्मच त्यासाठी आहे. कोणी या संघटनेला संपवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातली जनता संघटनेच्या पाठीशी ठाम उभी असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. आझाद मैदानावर होणाऱ्या मेळाव्यावरून मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नसल्याचे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वात मिलावट असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला होता, त्याबाबत विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची काळजी करावी, त्यांनी गद्दारी करून हा पक्ष सोडलेला आहे. त्यांनी आम्हाला विचार देण्याची गरज नाही. शिवसेना (Shivsena) पक्षाचे विचार हे हिंदुत्वादी असून, तेच आमचे राष्ट्रीयत्व असल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले.

दरम्यान, ५७ वर्षांपासून या शिवाजी पार्कला विचारांचे सोन वर्षातून एकदा शिवसैनिकांना मिळत असते. ते एक प्रकारचे टॉनिकच असते. त्यामुळे विचारांचे सोनं घेऊन वर्षभरातील काम होत असतात. शिवाजी पार्कवर गर्दी जमवण्याची ताकद कुणाची नाही ती फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात आहे.

जरांगे पाटील त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. त्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहे. मात्र, राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे; पण प्रत्येक जाती धर्मातील लोकांना एक एक महिन्याची वेळ देऊन सरकार त्यांना खेळवत असून, निवडणूक येऊ द्या जनता त्यांना दाखवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT