Maharashtra Politics News  Sarkarnama
मुंबई

Thackeray Group Slams CM Eknath Shinde : अजितदादा सरकारमध्ये घुसल्याने मुख्यमंत्री शिंदेंच्या हृदयाचे ठोके वाढले...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजारपणावरून ठाकरे गटाचे मुखपत्र 'सामना'मधून कागदी बाण सोडण्यात आले आहेत. अग्रलेखातून त्यांच्या कामाची खिल्ली उडवली आहे. "अजित पवार सरकारमध्ये घुसल्याने शिंदे यांच्या हृदयाचे ठोके वाढले असून मन अस्थिर झाले आहेत. त्यातच शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी वाढल्याने या सगळ्यांच्या लहान मेंदूला त्रास होऊ लागला आहे," असा टोला अग्रलेखातून लगावला आहे.

"शिंदे साताऱ्यात जाऊन गावठी उपचार घेत आहेत. जडीबुटी, जादूटोणा आणि बुवाबाजीच्या माध्यमातून उपचार घेणं योग्य नाही. आरोग्य ही संपत्ती आहे, तिचं रक्षण खोक्यांनी होत नाही. मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा कोणीच घेऊन आलेलं नाही. शिंदे यांना वाटतं मीच शेवटच्या श्वासपर्यंत राहील. पण अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे त्यांच्या श्वसननलिकेत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांना गुदमरल्यासारखे होत आहे, अशा शब्दात अग्रलेखातून चिमटा काढण्यात आला आहे.

"मुख्यमंत्री २४ तास काम करतात असं सांगितलं जातं. पण त्यांचं काम तर कुठेच दिसत नाही. कधीही पद गमवावे लागेल या भीतीतून मुख्यमंत्र्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे त्याला २४ तास काम करणे म्हणत नाहीत. मुख्यमंत्री उठसूट हेलिकॉप्टरने साताऱ्यातील दरे गावातील शेतावर आराम करायला जातात," असे यात म्हटलं आहे.

गुप्त बातमी फुटल्यानेच शिंदेंचा आजार बळावला..

"चार दिवसांपूर्वी अमित शाह पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी गुप्त गाठीभेटी घेतल्या. नेतृत्व बदलावर त्यांच्या चर्चा झाल्या. ही गुप्त बातमी फुटल्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजार बळावला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या मंडळींनी हा आजार गंभीरपणे घेतला पाहिजे. दोन पवारांची गंमतभेट आणि मुख्यमंत्र्यांचा वाढता आजार हे वैयक्तिक प्रश्न आहेत. पण महाराष्ट्र म्हणजे गंमतजंमत नाही," असे अग्रलेखातून सुनावले आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT