Sanjay Raut On PM Narendra Modi  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut On PM Modi : ठाकरे गटाचे 'फायरब्रॅंड' नेते राऊतांकडून मोदींवर कौतुकाचा वर्षाव, म्हणाले, ''आमच्यात कितीही मतभेद असोत, पण...''

PM Narendra Modi Birthday : '' ... हे आपण मान्य केलं पाहिजे...''

Deepak Kulkarni

Mumbai : देशाचे लाडके आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाजपकडून २ ऑक्टोबरपर्यंत 'सेवा सप्ताह' राबवला जाणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपसह विरोधी पक्षाच्या नेत्यांकडूनही मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे फायरब्रॅंड नेते संजय राऊतांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कधी 'सामना' कधी जाहीर सभा, तर कधी पत्रकार परिषदेतून टीकेची झोड उठविणाऱ्या राऊतांनी आज चक्क मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी(Sanjay Raut) रविवारी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राऊत म्हणाले, आमच्यात कितीही मतभेद असो, पण नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घ आयुष्य मिळो. त्यांच्या हातून देशाची सेवा घडत राहो. नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कठीण काळात देशाचे नेतृत्व केलं आहे. हे मान्य केलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणालेत.

राऊत म्हणाले, मणिपूरपासून बेरोजगारी आणि महागाईपर्यंत अशा अनेक समस्या देशासमोर आहेत. त्यांना पुढच्या वर्षापर्यंत या समस्यांना तोंड द्यावं लागेल. जोपर्यंत ते सत्तेत आहेत. तोपर्यंत त्यांना अशा समस्यांशी संघर्ष करण्याचं बळ मिळो, याच सदिच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

...तर आजही देशातील जनता अस्वस्थ व अस्थिर !

ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी पंतप्रधानांवर कौैतुकाचा वर्षाव करतानाच त्यांच्यावर निशाणाही साधला. ते म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारकडून नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या नावाने योजना सुरू करत आहेत. जर 2024 च्या निवडणुकीच्या दृष्टीतून होत असेल तर ते चुकीचं आहे. ते आपलं कर्तव्य आहे. तुम्ही अशा किती योजनाला कुठल्या नेत्याचं नाव दिली. तरी मतं मिळत नाहीत. देशावर अनेक समस्या, अनेक संकटं आहेत. जर देशाचा विचार केला तर आजही देशातील जनता अस्वस्थ व अस्थिर आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले, जेव्हा राज्यात अडीच वर्षे आमचं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं. तेव्हा हेच लोक मुंबई- गोवा महामार्गावरून टीका करत होते. आता तुम्ही काय करताय? असा सवालही त्यांनी सरकारला केला. तुमच्या सरकारलाही एक वर्ष झालं ना… तुम्हीही हा रस्ता नीट करू शकला नाहीत. तुम्ही राज्याचा काय विकास करणार आहात, अशी घणाघाती टीकाही राऊतांनी या वेळी शिंदे - फडणवीस - पवार सरकारवर केली.

तसेच मी स्वतः चिंतेत आहे. मला उद्या कोकणात गावाला जायचं आहे. सकाळपासून मी आणि बंधू आमदार सुनील राऊत हे विचार करत आहोत की, गावाला कसं जायचं. आमच्या घरातील काही लोक गावाला पोहोचले आहेत. त्यांनी सांगितलं की, आम्ही कसे पोहोचलो हे आम्हालाच माहिती आहे. कारण रस्त्यांची अवस्था खूप बिकट आहे, असं त्यांनी म्हटलं.

काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गेंनीही(Mallikarjun Kharge) मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. खर्गे ट्विट करत म्हणाले, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो', असं ट्विट खर्गे यांनी केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून लिहिले आहे की, देशाचे सर्वात लाडके नेते आणि आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. मोदीजींनी त्यांच्या प्रथम भारत या विचाराच्या आधारावर गरिबांच्या कल्याणासाठीचे संकल्पासारखी अशक्य कामे शक्य करून दाखवली आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT