anand ashram.jpg sarkarnama
मुंबई

VIDEO : ठाण्यातील 'आनंद आश्रमा'त नोटांची उधळण, केदार दिघे संतापले

Akshay Sabale

ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते, आनंद दिघे यांचं 'आनंदाश्रम' हे शिवसैनिकांचं प्रेरणास्थान. या आनंद मठातील ( आताचे आनंद आश्रम ) एका खोलीत आनंद दिघे यांचं वास्तव्य होते. मात्र, शुक्रवारी आनंद आश्रमात घडलेल्या एका प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे. येथे आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर नोटा उधाळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. यानंतर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे शिंदे गटावर भडकल्याचे पाहायला मिळाले.

शिवसेनेत ( Shivsena ) फूट पडल्यानंतर टेंभी नाक्यावर असलेल्या 'आनंद मठा'चे नाव 'आनंद आश्रम' करण्यात आले होते. 1967 च्या सुमारास दिवंगत आनंद दिघे यांनी ही जागा भाड्यानं घेतली होती. तेव्हापासून याची ओळख 'आनंद मठ' अशी झाली. येथून आनंद दिघे यांनी शिवसेना वाढीबरोबरच अनेक आंदोलने, चळवळी उभारल्या. येथील एका खोलीत आनंद दिघे यांचे वास्तव्य होते. दिघे यांच्या निधनानंतर त्यांची खुर्ची तेथे असून, शिवसैनिक येथे नतमस्तक होतात.

पण, शुक्रवारी 'आनंद आश्रमा'तील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात गणेशोत्सवातील मिरवणुकीत ढोल पथकावर पैसे उधळल्याचं दिसत आहे. आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर पैसे उधळल्यानं सर्व स्तरातून टीका होत आहे.

याच प्रकरणावरून 'आनंद हरपला,' अशी प्रतिक्रिया व्यक्त करत केदार दिघे यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. "दिघेसाहेबांचं पूजन आपण करतो, देव मानतो, दैवत समजतो, त्यांच्या प्रतिमेसमोर नोटा उधळणे, ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे. दिघेसाहेबांची प्रतिमा, संस्कार, तत्त्व आणि त्यांचे विचार चुकीच्या पद्धतीनं जनतेसमोर जात असतील, तर दु:खदायी आहे. 'आनंद आश्रम' हा 'आनंद आश्रम' राहिला नाही. खऱ्या अर्थानं आपला 'आनंद हरपला' आहे," असं केदार दिघे यांनी म्हटलं आहे.

ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी, 'ही प्रथा' असल्याचं म्हटलं आहे. "टेंभी नाक्यावरील गणेश विसर्जन करताना ही प्रथा आहे. काही लोक चुकीच्या पद्धतीनं टीका करत आहेत. ज्या पदाधिकाऱ्यानं पैसे देण्याची पद्धत वापरली आहे, त्याच्यावर पक्षानं कारवाई केली आहे," असं खासदार म्हस्के यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT