Gajanan Kirtikar, Ramdas Kadam News Sarkarnama
मुंबई

Ramdas Kadam - Kirtikar : शिंदेंच्या शिलेदारांमधील वाकयुद्ध थांबेच ना; कीर्तिकरांकडून गद्दारीचे पाढे तर कदम म्हणतात, " गजाभाऊंना..."

Deepak Kulkarni

Mumbai : ऐन दिवाळीत शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण तापलं आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस टोकदार होत चालला आहे. कीर्तिकरांनी गद्दारीचे पाढे वाचल्यानंतर आता रामदास कदमांनी पुन्हा गजाभाऊंवर टीकेची तोफ डागली आहे. यापुढेही या दोन नेत्यांमधील वाद आणखी तापण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना शिंदे गटातील दोन ज्येष्ठ नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी रामदास कदमांबाबत केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर आता रामदास कदम यांनी भाष्य केले आहे. त्यांनी कीर्तिकरांचे वय झाले असून, त्यांना आता चांगल्या उपचारांची गरज असल्याचे सांगत पलटवार केला आहे.

रामदास कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी गजानन कीर्तिकरांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, गजाभाऊंचे वय झालेय त्यांना डॉक्टरांची गरज आहे. पक्षाच्या नेत्यांविरुद्ध बोलताना पक्षप्रमुखांसोबत चर्चा करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी थेट निवेदन जारी करत बेछूट आरोप केले असल्याची टीका त्यांनी केली आहे.

तसेच कीर्तिकर हेच शिवसेनेसोबत गद्दारी करत असून, गोरेगाव येथील कार्यालयात वडील आणि मुलगा एकाच कार्यालयात बसत आहेत. आपला खासदारकीचा निधी मुलाच्या मतदारसंघातील विकासकामांकरिता देत आहेत. मात्र, मला बदनाम करण्याचं काम हे आमच्या पक्षातीलच एक ज्येष्ठ नेता करत आहे. तसेच त्यांनी या वेळी कीर्तिकर यांच्या रक्तातच भेसळ झाली असल्याचा तिखट वार केला आहे.

रामदास कदम काय म्हणाले...?

रामदास कदमांनी (Ramdas Kadam) खासदार गजानन कीर्तिकरांचे आरोप खोडून काढताना म्हणाले, मला शिवसेनाप्रमुखांनी खेड मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. त्यावेळी केशव भोसले यांच्यासोबत माझी लढत होती. भोसलेंना दाऊदचा पाठिंबा होता. त्यावेळी तो देशातून बाहेर पळाला नव्हता. त्यामुळे माझी लढत दाऊदसोबत होती. आता तिकडे माझा संघर्ष सुरू असताना गजाभाऊंना मालाडमध्ये कशासाठी पाडायला येऊ, असा सवाल कदम यांनी कीर्तिकरांना केला आहे. आणि गजाभाऊंना थेट 33 वर्षांनंतर याची आठवण कशी झाली असेही ते म्हणाले.

याचदरम्यान, उद्धव ठाकरेंच्या आदेशाने अनंत गीतेंनी मला गुहागरमधून पाडलं. त्यामुळे ज्या गीतेंनी मला पाडलं त्यांचा प्रचार करणार नाही, असं मी अगोदरच स्पष्टपणे सांगितले होते. तेव्हा मला राज्यात इतरत्र पाठवण्यात आले. गद्दारी मी नाही तर तुम्ही करत आहात. तुमचं पितळ उघडे पडले म्हणून तुमचं पित्त खवळले असल्याचा हल्लाबोल कदम यांनी केला आहे.(Shivsena)

कीर्तिकरांचा खळबळजनक दावा काय...?

शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकरांनी रामदास कदमांविरोधात पत्र काढत टीकेची झोड उठवली होती. ते म्हणाले, माझ्यावर गद्दारीचा संशय व्यक्त करणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी मालाड विधानसभा निवडणुकीत मला तसेच लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांना पाडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या तोंडी गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे, असा हल्लाबोल शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केला.

कीर्तिकर म्हणाले, रामदास कदम यांच्या गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत मालाड मतदारसंघातून मला पाडवण्यासाठी त्यांनी भरपूर अयशस्वी प्रयत्न केले होते. नंतर खेड ते पुणे प्रवासात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीत बसून रामदास कदम राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत सविस्तर चर्चा करत होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांना पाडण्यासाठीही कदम यांनी भरपूर निष्फळ प्रयत्न केले होते, असा गौप्यस्फोट गजानन कीर्तिकर यांनी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT