State Scheme
State Scheme Sarkarnama
मुंबई

State Government : शिधा पोहचलाच नाही, लाभार्थींच्या आनंदावर विरजण; पुण्यात केवळ चार टक्के नागरिकांना लाभ

दीपा कदम

State Govt fail to Distribution a Dose of Happiness : दिवाळीनंतर आता गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यात पुन्हा एकदा आनंदाचा शिधा वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यातून सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना लाभ मिळणार असे सांगण्यात आले.

दरम्यान, गुढीपाडवा झाला. आता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली. मात्र सरकारला शिधा पोहचवता आला नसल्याने लाभार्थींचा आनंद हिरावल्याची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात प्रत्यक्षात केवळ २९ टक्के (४७ लाख ३१ हजार ९१६) लाभार्थींपर्यंतच आनंदाचा शिधा पोहचला आहे.

कोकणात (Konkan) सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीतील आठ लाख ४८ हजार २७३ लाभार्थी आहेत. त्यातील केवळ १९ हजार २१७ जणांनाच लाभ मिळाल. पुणे (Pune) शहरात तीन लाख १७ हजार ८८१ लाभार्थी असून त्यातील केवळ १४ हजार ३६३ म्हणजे साडेचार टक्के नागरिकांना लाभ मिळाला.

दरम्यान, दिवाळीचा सण गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा ही योजना जाहीर केली होती. त्यावेळी दिवाळीनंतर दोन महिने हे वाटप सुरू ठेवावे लागले होते. त्यानंतर आता औरंगाबाद आणि अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्यरेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचे जाहीर केले.

गुढी पाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी ‘ई-पॉस’द्वारे हा शिधा वितरित केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. ‘ई-पॉस’ची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने हा शिधा दिला जाणार होता.

आता पुन्हा सार्वजनिक वितरणाचे तेच रडगाणे सुरू झाले आहे. सध्या ठेकेदारांकडून माल पोहोचला नसल्याने लाभार्थींना आनंदाचा शिधा वितरण करण्यात अडचणी येत असतात. यावेळी मात्र ठेकेदारांकडून माल पोहोचल्यानंतरही तो वितरित होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

योजनेबद्दल थोडक्यात माहिती

- राज्यात एक कोटी ५८ लाख ४६ हजार १८३ लाभार्थी लाभ घेऊ शकतात

- राज्य सरकार ५०० कोटींचे अनुदान यासाठी देणार

- ठेकेदारांकडून ९२ टक्के माल जिल्ह्यांपर्यंत पोहोचला

- उपलब्ध पिशव्यांपैकी केवळ ४७ लाख ३१ हजार ९१६ म्हणजेच केवळ २९ टक्के लाभार्थींच्या हाती

- दिवाळीत ही योजना राबविण्यात आली तेव्हा ४७३ कोटी ५८ लाख रुपये खर्च

- आता पुन्हा निविदा प्रक्रियेद्वारे ही योजना राबविणार त्यासाठी किमान ५०० कोटींचा खर्च अपेक्षित

- सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड खालोखाल पुणे शहरात अंमलबजावणी निराशाजनक

- सिंधुदुर्गात १९ हजार पिशव्या मिळाल्या असूनही ०.०८ टक्के म्हणजे १२२ जणांनाच हा लाभ मिळाला

- पुणे ग्रामीणमध्ये वितरण ५० टक्क्यांपर्यंत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT