Shinde-Fadnavis government Sarkarnama
मुंबई

State Govt Scheme: कर्नाटकच्या धर्तीवर राज्य सरकार आणणार मोठी योजना; कार्डधारकांना मिळणार 10 किलो मोफत धान्य?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय पक्षांकडून सभा, मेळावे घेण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यातील जनतेसाठी मोठ्या योजनांच्या घोषणा केल्या. आता आगामी काळात सर्व सामान्य नागरिकांसाठी राज्य सरकार पुन्हा एकदा मोठी योजना आणण्याच्या तयारीत आहे.

कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने जाहिरनामा प्रसिद्ध करत पाच मोठ्या घोषणा केल्या होत्या. त्यामध्ये महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवास, तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला दरमहा 10 किलो तांदूळ यासह अजून मोठी आश्वासनं काँग्रेसने दिली होती. त्यांचा काँग्रेसला मोठा फायदा होत कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन झालं. आता याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील आगामी काळात प्रत्येक कार्डधारकांना 10 किलो मोफत धान्य देण्याची योजना राज्य सरकार आणण्याच्या तयारीत आहे.

महाराष्ट्रात महिलांसाठी सरकारी बसमध्ये हाफ तिकिटाची सवलत राज्य सरकारने दिलेली आहे. त्याबरोबरच शेतकऱ्यांसाठी एक रुपयांत विमा, तसेच शेतकऱ्यांसाठी 'नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने'ची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली. या योजनेच्या माध्यमातून 'पीएम किसान'च्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.

'लेक लाडकी' या योजनेसह अजून काही योजना राज्य सरकारने आणल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी शासनाने गुढीपाडवा सणासाठी रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा शंभर रुपयांत दिला होता. यानंतर आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटकच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक कार्ड धारकाला दहा किलो धान्य देण्याची मोठी योजना आणण्याच्या तयारीत आहे. ही योजना येत्या सप्टेंबरपासून अमलात येण्याची तयारी सुरू असल्याची माहिती एका बड्या शासकीय अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा आगामी निवडणुकीत किती फायदा होईल, हे येत्या काळात जरी स्पष्ट होणार असलं तरी पुन्हा एक नवी योजना सरकार आणण्याच्या तयारीत असल्याने ही योजना नेमकं कशी असेल? याचा लाभ नेमकी कुणाला होणार? तसेच या योजनेचा आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपाला फायदा होणार का? हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT