IAS Tukaram Mundhe 
मुंबई

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना कोणी दिली धमकी? धडक कारवायांच्या पार्श्वभूमीवर स्वतः दिलं स्पष्टीकरण; 'त्या' व्हायरल क्लीपवर थेटच बोलले

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवायांचा धडाका लावला आहे.

Amit Ujagare

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवायांचा धडाका लावला आहे. याच कारणासाठी आता त्यांना धमक्यांचे फोनही आल्याची एक व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यावरुन बऱ्याच चर्चाही सोशल मीडियावर सुरु आहेत. यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत स्वतः तुकाराम मुंढे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

जी व्हिडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्याचीच आहे. या व्हिडिओत खुद्द तुकाराम मुंढे हे सांगत आहेत की, "मला कालपर्यंत धमकीचं चौथं पत्र आलेलं आहे. यामधून मला आणि माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याची आणि उद्ध्वस्त करण्याची त्यात भाषा केलेली आहे. याप्रकरणी मी आधीच एफआयआर केलेला आहे, याचा तपास सुरु आहे. याचा तपास झाल्यानंतर जो कोणी गुन्हेगार असेल त्याला पकडलं जाईल अशी मला अपेक्षा आहे. यावर मला एकच सांगायचं आहे की, जर कोणी धमक्या देऊन माझ्या निर्णयात बदल करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो कदापीही यशस्वी होणार नाही. पुरेशी सुरक्षा मला शासनानं दिलेली आहे आणि तेवढी मी काळजी घेईन माझं कुटुंबही त्याप्रमाणं काळजी घेईल परंतू धमकीच्या माध्यमातून मला माझा निर्णय कोणी बदलायला भाग पाडत असेल तर ते होणार नाही. अशा लोकांनी माझा इतिहास तपासून पाहावा त्यामुळं मी अशा धमक्याकडं दुर्लक्ष करतो"

या व्हायरल क्लीपवर आजच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं मुंढेंना प्रश्न विचारला. पत्रकारानं म्हटलं की, "भेसळ करणाऱ्यांवर तुम्ही मकोकाची कारवाई केलीत. यामुळं तुम्हाला परत धमकी येऊ शकते!" यावर प्रश्नावर आश्चर्याच्या मुद्रेत त्यांनी सांगितलं की, "मला धमकी आलेलं कोणी सांगितलं तुम्हाला? नाही मला कोणाचीही धमकी आलेली नाही. जी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ती जुनी क्लीप आहे, कमीत कमी दहा वर्षांपूर्वीची आहे. ती आत्ताची ताजी क्लीप नाही. मला व्यवस्थित आठवत नाही पण ती क्लीप पुण्यातली आहे, जेव्हा मी पीएमपीएमएलचा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक होतो. त्यामुळं तुम्ही ती तपासून पाहा ती क्लीप आत्ताची नाही. मला अशी धमकी आलेली नाही"

दरम्यान, पत्रकार परिषदेत तुकारम मुंढे यांनी आपण अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर केलेल्या कारवाईचा लेखाजोखा सांगितला. त्यानुसार, आपण आजवर बनावट अन्न पदार्थ तयार करणारे किंवा भेसळ करणाऱ्या २६० उत्पादकांवर, अशा भेसळयुक्त मालाची वाहतूक करणाऱ्या १९० वाहतूकदारांवर तसंच असा भेसळीचा माल पुरवठा करणाऱ्या २४८ अशा एकूण ७०३ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं आजवर भरपूर एफआयआर आम्ही केले आहेत, तसंच त्यांची पुढची न्यायालयीन प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे. पण या कारवाईतूनही जर भेसळीचा प्रकार हद्दपार झाला नाहीतर त्याची पुढची पायरी आपण चढणार आहोत, त्याची सुरुवात आपण आजपासून करतो आहोत, असा थेट इशाराच तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT