Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Maharashtra Budget 2024 : उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पाचे वाभाडेच काढले; केली मोठी मागणी...

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या अखेरचा अर्थसंकल्प वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सादर केला. यातून अनेक लोक कल्याणकारी योजनांची घोषणा करण्यात आली. मात्र लोकसभा निवडणुकीत वाट्याला आलेली नामुष्की विधानसभेत टाळण्यासाठी अर्थसंकल्पातून मतपेरणी केल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

गेल्या दोन वर्षांत या सरकारने केलेल्या घोषणांपैकी किती योजना आमलात आणल्या, याबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी महाविकास आघाडीतर्फे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray या अर्थसंकल्पाचे वाभाडे काढले. ते म्हणाले, लोकसभेत राज्याने जो काही दणका दिला, त्याचे परिणाम म्हणूनच या अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. मात्र राज्यातील स्वाभिमानी जनता या थापांवर विश्वास ठेवणार नाही. सध्या महाराष्ट्र हा गुजरातच्या पाठी गेलेला आहे. आता जनतेच्या डोळ्यात धूळफेक करायची आणि सत्तेत येऊन पुन्हा राज्याला लुबाडायला सुरुवात करायची, असाच डाव सत्ताधाऱ्यांचा असल्याची टीका ठाकरेंनी केली.

आजचा हा अर्थसंपकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती. थापांचा महापूर आहे. त्यात सगळ्याच घटकांना जोडण्याचा खोटा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीसांच्या Devendra Fadnavis भाषेत सांगायचे झाले तर हा अर्थसंकल्प म्हणजे खोटे नरेटिव्ह आहे. अर्थसंकल्पात योजनांसाठी अर्थिक तरतूद कशी करणार, याचा कुठेही उल्लेख नाही. आजपर्यंत गेल्या दोन वर्षांत त्यांनी ज्या काही घोषणा केल्या त्यातील किती आमलात आल्या? आता या घोषणांची तज्ज्ञांची समिती नेमून निवडणुकीपूर्वी श्वेतपत्रिका काढावी. अनेक योजना अशा आहेत की घोषणा करूनही आमलात आलेल्या नाहीत, याकडेही ठाकरेंनी लक्ष वेधले.

महिलांना मतदानात आपल्या बाजूला करून घेण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केलेला दिसून येतोय. महिलांसाठी जी काही योजना आणत असाल तर त्यांना आमचा पाठिंबाच आहे. मात्र मुलगा आणि मुलगी अशा भेदभाव करू नका, असेही सूचवले होते. मात्र मुलांसाठी कुठेही अर्थसंकल्पात वाच्यता नाही. राज्यात हजारो तरुण बेकार आहेत. या रोजगार वाढीवर कुठेही ते बोललेले नाहीत.

शेतकऱ्यांसाठी वीजबील माफीची मागणी त्यांनी मान्य केली. मात्र आजपर्यंत जी काही विजबिलाची थकबाकी आहे, ती माफ होणार का याबाबत ते बोलले नाहीत. वीजमाफी करताना त्यांनी कर्जमाफीकडे दुर्लक्ष केले. यापूर्वीही काँग्रेस सरकारने वीजमाफी केली होती. मात्र निवडणूक जिंकल्यानंतर दामदुपटीने ते वसूल केले, याची आठवणही ठाकरेंनी करून दिली.

शेतकऱ्यांना एका बाजुने लुटायची कामे सुरू आहेत. दुसऱ्या बाजून त्यातील काही भाग द्यायचा, असे सरकारचे ढोंग सुरू आहे. सरकारच्या या घोषणा म्हणजे लबाडाघरचे आवताण आहे. जेवल्याशिवाय खरे मानायचे नाही. अच्छे दिन, 15 लाख हे जसे जुमले होते, तसाच आजचा अर्थसंकल्प हा 'जुमलासंकल्प' आहे, अशी टीकाही ठाकरेंनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT