Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या २५व्या वर्धापनदिनी मोठी घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद दिलं. तर पक्षातील इतर काही नेत्यांकडे जबाबदाऱ्यांचं वाटप केलं. मात्र, या सर्व फेरबदलांमध्ये अजित पवारांकडे कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. यावरुन तर्कवितर्कांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. याचदरम्यान, ठाकरे गटानं अजित पवारांना डिवचलं आहे.
शिवसेना(ठाकरे गट) पक्षाचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून सातत्यानं राजकीय घडामोडींवर भाष्य केलं जात. नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ व्या वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शरद पवारां(Sharad Pawar)नी पक्षात मोठे फेरबदल करतानाच खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह प्रफुल्ल पटेलांसह तटकरेंवर मोठी जबाबदारी सोपवली. मात्र, अजित पवारांकडे कुठलीही जबाबदारी देण्यात आली नाही. यावरुनच ठाकरे गटानं अजित पवारांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
''...त्यांचा पिंड नाही!''
अजित पवार यांना नव्या फेररचनेतून वगळले. त्यामुळे ते दिल्लीतील कार्यक्रमातून निघून गेले वगैरे नेहमीच्या कंड्या पिकविण्यात आल्या. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले ‘खिलाडी’ आहेत व राज्याच्या बाहेर पडून काम करण्याचा त्यांचा पिंड नाही असंही ठाकरे गटानं म्हटलं आहे.
अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा एक गट...
अजित पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत व त्यांच्या नेतृत्वाखालचा गट हा भाजपच्या दगडावर पाय ठेवून आहे असे नेहमीच सांगितले जाते. अडीचेक वर्षांपूर्वी त्यांनी फडणवीस यांच्याबरोबर पहाटेचा शपथविधी केल्याचा हा परिणाम. अजित पवार हे भाजपच्या तंबूत जाऊन परत आले हा त्यांच्यावर ठपका आहे. व हा ठपका कायमचा दूर करण्यासाठी अजित पवारांनाच शर्थ करावी लागेल असा टोलाही ठाकरे गटानं लगावला आहे.
दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का पडली?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा(NCP)ने राष्ट्रीय दर्जा गमावला आहे. नागालॅण्डमध्ये त्यांचे चार-पाच आमदार निवडून आलेत. राज्याबाहेर लक्षद्वीप येथे त्यांचा एक खासदार आहे. केरळ विधानसभेत त्यांचे एक-दोन सदस्य आहेत. बाकी सर्व कारभार महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सर्व काही आटोपशीर आहे. मग एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का पडली? हाच काय तो प्रश्न असल्याचंही 'सामना'च्या अग्रलेखात ठाकरे गटानं म्हटलं आहे.
नाराजीच्या चर्चांवर अजित पवार काय म्हणाले होते?
अजित पवार (Ajit Pawar)यांनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी नाराजीच्या चर्चांवर भाष्य केलं. पवार म्हणाले, माझ्या नाराजीच्या बातम्यात तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेला निर्णय हा आमचा पक्षांतर्गत निर्णय आहे. मला केंद्राच्या राजकारणात रस नाही, राज्याच्या विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी माझ्यावर आहे.
तसेच राज्याच्या राजकारणात मला रस आहे. आणि ते काम मी करत आहे. असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. खासदार असताना मी राष्ट्रीय पातळीवरील कामकाज पाहिले पण त्यानंतर मी राज्याच्या राजकारणात सक्रिय झालो, असही त्यांनी यावेळी सांगितलं.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.