Maharashtra politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आमदार सचिन अहिर यांनी मंगळवारी मोठा धक्का दिला. त्यांनी अचानक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. बुधवारी त्यांची बिनविरोध निवडही झाली. या घडामोडी घडत असतानाच ठाकरेंकडील आणखी एक आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे.
विधानपरिषदेतील ठाकरेंच्या पक्षाचे आमदार सुनिल शिंदे हे एकनाथ शिंदेंसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अहिर यांच्याप्रमाणेच सुनिल शिंदे हेही २०२२ मधील एकनाथ शिंदे यांच्या बंडाआधी निवडून आलेले आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते शिवसेनेचेच आमदार आहेत. अहिर यांनी उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर याच मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंनी त्यांच्या अपात्रतेचा मुद्दा निकाली काढला.
सुनिल शिंदे यांनीही एकनाथ शिंदेंची साथ दिली तरी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही, ही शक्यता गृहित धरून त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. सुनिल शिंदे यांनी या सर्व चर्चा खोडून काढल्या आहेत. सर्व चर्चा निराधार असल्याचे सांगत त्यांनी आपले हित शत्रू या वावड्या उठवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरेंकडे कोण-कोण?
अहिर यांनी शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ठाकरेंकडे विधानपरिषदेत केवळ पाच आमदार उरले आहेत. त्यामध्ये सुनिल शिंदे यांच्यासह ज. मो. अभ्यंकर, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांचा समावेश आहे. अभ्यंकर यांना उपसभापतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेकडून माघार घेण्यात आली.
उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या जागी दानवे यांची वर्णी लागली. त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. परब यांनी २०२४ च्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळविला आहे. तर नार्वेकरही २०२४ मध्येच विधानपरिषदेत पोहोचले आहेत. अभ्यंकर यांनीही २०२४ मध्ये झालेल्या मुंबई शिक्षक मतदारसंघातून विजय मिळविला आहे. या तिन्ही आमदारांचा कार्यकाळ २०३० पर्यंत आहे. सुनिल शिंदे यांचा कार्यकाळ २०२८ मध्ये संपत आहे. तर दानवे हे २०३२ पर्यंत आमदार असतील.
पाच आमदारांपैकी केवळ सुनिल शिंदे यांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही. कारण ते २०२२ मध्ये मुळ शिवसेनेचेच उमेदवार होते. ही मुळ शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उर्वरित चार आमदारांना मात्र पक्षांतर बंदी कायदा लागू होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.