Uddhav Thackeray - Anil Desai News Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी; 'या' उमेदवाराने घेतली निवडणूक आयुक्तांची भेट, दाव्यानंं खळबळ

Loksabha Election 2024 : ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर सडकून टीका केली आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यांतील मतदान प्रक्रिया सोमवारी (ता.20) पार पडले.यात मुंबईतील सहा मतदारसंघासह एकूण राज्यातील 13 ठिकाणी मतदान झाले. मात्र,मुंबईत अनेक ठिकाणी धीम्या गतीने मतदान झालं.काहींना तास न् तास मतदान केंद्राबाहेर रांगेत उभं राहावे लागले. यामुळे मतदानाचा टक्काही घसरल्याचे बोलले जात आहे.याचवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बोगस मतदान झाल्याचेही आरोप करण्यात आले आहे.

तसेच निवडणूक आयोगाकडून अनेक मतदानकेंद्रावर मतदारांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधाही उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून आले. या सगळ्या तक्रारींनंतर राजकीय आरोप- प्रत्यारोपांनी राळ उठली असून सत्ताधारी- विरोधक आमने- सामने आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाच्या उमेदवाराने थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बुधवारी (ता.22) भेट घेतली.मतदानादिवशीच माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करतानाच मुद्दामहून ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचे मतदान जास्त आहे, तिथे संथगतीने मतदान सुरू असल्याचा दावा केला होता.तसेच त्यांनी रात्री कितीही उशीर झाला तरी मतदान केंद्रातून मतदान करुनच बाहेर पडा असं आवाहन केलं होतं. त्यांच्यानंतर आता ठाकरे गटातील उमेदवाराने पुन्हा एकदा मुंबईतील मतदानानंतर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई (Anil Desai) यांनी निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर सडकून टीका केली आहे.ते म्हणाले, मतदारांसाठी असलेली व्यवस्था अत्यंत ढिसाळ होती.जिथे आमच्या मशालला जास्त मतदान होणार होतं, तिथं मतदान संथ गतीनं होत होतं.मतदानादिवशी व्यवस्था चोख असणं आणि राबवणं हे त्यांचं आयोगाचं कर्तव्य आहे. तेच कर्तव्य ते राबवत नसतील तर मग लोकशाहीचा उत्सव असल्याचं म्हणणं फोल असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

देसाई म्हणाले, मतदारांना आयडेंटी प्रूफ मागितले जात होते. पण ते दाखवल्यानंतर त्यांना सरळसरळ हाकललं जात होतं.काही मतदान केंद्रावर तर पोलिंग स्टाफ एवढा धजावला होता,तो सांगत होता कुठे मतदान करा.असा खळबळजनक दावा करतानाच हे काय चाललंय काय? ही काय मुघलाई आहे का?असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. लोकशाही असलेल्या देशात, अन् तेही महाराष्ट्रासारख्या राज्यात घडावं,हे खरोखर अनपेक्षित आहे अशी नाराजी यावेळी अनिल देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.

निवडणुकीसाठी ड्युटीवर आलेल्या लोकांना कोणत्याच प्रकारची सोय करण्यात आली नाही. अगदी ती लोकं उघड्यावर झोपली. तशी छायाचित्र सर्वत्र प्रसिद्ध झाले. ही हालअपेष्टा का? हा उत्सव तुम्ही म्हणता मग असा विरोधाभास का? असा संतप्त सवालही अनिल देसाई यांनी यावेळी उपस्थित केला.

अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, पाचव्या टप्प्यात घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत मुंबईत मतदानाची टक्केवारी कमी झाली. याला निवडणूक आयोगाचा अनागोंदीपणा आणि निष्काळजीपणा जबाबदार आहे. पिण्याची पाण्याची गैरसोय, मतदान केंद्रावर मंडप नसणे, मोबाईल बंदीमुळे नागरिकांमध्ये नाराजी याकडे सरकारच मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले. यापाठीमागं मोठं षडयंत्र असल्याचा आरोप दानवेंनी केला.

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची बदली करण्याचा सरकारने डाव रचल्याचा खळबळजनक दावाही अंबादास दानवे यांनी यावेळी केला.राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या दोन बोटांवर निवडणूक अधिकाऱ्यांनी  शाई लावली. राज्याच्या निवडणूक आयोगांबाबत अशी स्थिती असल्यास सामान्य माणसाचे काय अवस्था असेल, अशी विचारणाही दानवे यांनी यावेळी केली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT