Raj thackeray | Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : शेण अन् बांगड्या फेकल्या; उद्धव ठाकरे 35 मिनिटांच्या भाषणात राज ठाकरे अन् मनसेवर काय बोलले?

Mns Worker Attacks Uddhav Thackeray : बीडमधील आंदोलनानंतर मनसेचे कार्यकर्ते संतापल्याचे दिसत आहेत. त्यातच ठाण्यात दबा धरून बसलेल्या मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या वाहनांवर शेण आणि बांगड्या फेकल्या.

Akshay Sabale

बीडमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाहनांवर सुपाऱ्या फेकून आंदोलन केले. यावर राज ठाकरेंनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांना 'माझ्या नादाला लागू नका,' असा इशारा दिला होता. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून मनसेने ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या वाहनांवर शेण आणि बांगड्या फेकल्या.

यानंतर झालेल्या 'भगवा सप्ताहा'च्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि मनसैनिकांबद्दल काय बोलणार? याकडे लक्ष होते. मात्र, मनसेच्या आंदोलनावर आणि राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंनी आपल्या 35 मिनिटांच्या भाषणात चकार शब्द न काढला नाही.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक पक्ष मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यासाठी राज्यभरात निघालेल्या राजकीय यात्रांनी वातावरण ढवळून निघाले आहे. कधी नव्हे ते मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) मुंबई-पुणे-नाशिक या त्रिकोणाबाहेर पडून मराठवाड्यात नवनिर्माण यात्रेच्या माध्यमातून दौरा करत आहेत. बीडमध्ये त्यांच्या वाहनावर ठाकरे गटाने सुपाऱ्या फेकून 'चले जाव'च्या घोषणा दिल्या.

ठाकरे गटाच्या या आंदोलानंतर राज ठाकरेंसह मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे यांनी थेट उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि शरद पवार हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आडून राजकारण करत असल्याचा आरोप केला. तसेच, "माझ्या नादाला लागू नका. माझी पोर काय करतील याचा नेम नाही," असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

ठाकरे गटाने फेकलेल्या सुपाऱ्यांना मनसेने शेण आणि बांगड्यांनी प्रत्युत्तर दिले. ठाण्यात मनसेने उद्धव ठाकरेंच्या वाहनांवर शेण आणि बांगड्या फेकल्या. या प्रकारानंतर झालेल्या कार्यक्रमात ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता होती. ठाकरेंनी सुमारे 35 मिनिटे भाषण केले. या भाषणात त्यांनी एकदाही मनसेच्या कृतीचा किंवा राज ठाकरेंचा उल्लेख केला नाही. टोमणे, शब्दांनी घायाळ करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना मात्र अनुल्लेखाने मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान, बीडमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर राज्यभरातील मनसेचे कार्यकर्ते संतापल्याचे दिसत आहेत. ठाण्यातील कार्यक्रमापूर्वीच मार्गावर दबा धरून बसलेल्या मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या वाहनांवर शेण आणि बांगड्या फेकल्या. तर कार्यक्रमस्थळी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. मनसेचे अविनाश जाधव यांनी, "तुम्ही राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या आता 'सुपारी का जबाब पत्थर से' मिळणार. पुढे पुढे बघा काय होते," असा इशाराच ठाकरे गटाला दिला आहे.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT