Milind Narvekar-Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Milind Narvekar : उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांच्या विजयाचे गणित विधीमंडळात बसून जुळविले!

Vidhan Parishad Election : ठाकरेंनी नार्वेकरांची फक्त उमेदवारीच जाहीर केली नाही तर त्यांच्या विजयाची स्ट्रॅटेजीही आखली.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 12 July : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक तथा शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरवून ठाकरेंनी मोठी खेळी खेळली आहे. ठाकरेंनी नार्वेकरांची फक्त उमेदवारीच जाहीर केली नाही तर त्यांच्या विजयाची स्ट्रॅटेजीही आखली आहे. नार्वेकरांच्या विजयासाठी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भल्या सकाळीच विधीमंडळात पोचून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या कार्यालयातून सूत्रे हलवली. उद्धव ठाकरे हे विधानमंडळात ठाण मांडून बसले होते.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पाडल्यानंतर काही दिवस मिलिंद नार्वेकरही (Milind Narvekar) उद्धव ठाकरे आणि मातोश्रीपासून लांब होते. त्यावेळी नार्वेकरही शिंदे गटात सहभागी होणार का, अशी चर्चा रंगली होती. त्या वेळी मिलिंद नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात असलेल्या मैत्रीचा दाखला दिला जात होता. मात्र, मिलिंद नार्वेकर यांनी त्याबाबत भाष्य केले नव्हते. एक पोस्ट करून आपण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे आनंद दिघे आहोत, असे म्हटले होते. त्यानंतर नार्वेकरांबाबतची चर्चा थांबली होती.

उद्धव ठाकरेंची सावली म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उतरविण्यात आले आहे. वास्तविक शिवसेनेकडे एक उमेदवार निवडून येईल, एवढी मते नाहीत. तरीही ठाकरेंनी आपला हक्काचा मोहोरा विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरवून माईंड गेम खेळला आहे. नार्वेकर हे मुख्यमंंत्री शिंदे यांचेही चांगले मित्र आहेत. तसेच, सर्वपक्षीय मैत्रीपूर्ण संबंधही आहेत. त्या मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केल्याचे दिसून येते.

उद्धव ठाकरे हे केवळ नार्वेकरांची उमेदवार जाहीर करून थांबले नाही तर तशी राजकीय रणनीतीही आखली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे सुमारे साडे दहाच्या सुमारास विधीमंडळात दाखल झाले होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयातून सर्व सूत्रे हलवली.

अगदी बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार सव्वा तीनच्या सुमारास विधीमंडळात आले होते. त्या वेळी उद्धव ठाकरे विधीमंडळात होते. तसेच स्वतः मिलिंद नार्वेकर यांनीही विधीमंडळाच्या प्रवेशद्वारावरच बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांची भेट घेतली होती.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे संजय राऊत आणि इतर नेतेही रणनीती आखत होते. कालच माजी खासदार विनायक राऊत हेही विधीमंडळात आले होते. त्यामुळे नार्वेकरांसाठी शिवसेनेचे झाडून सारे नेते कामाला लागले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT