Mumbai Municipal Election 2026 : लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव पत्करावा लागलेल्या महायुतीने विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात पाठविण्यास सुरूवात करण्यात आली. याच लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मते दिली. आता महायुतीतील नेते प्रत्येक सभेत, कार्यक्रमात त्याचा उल्लेख करतात.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही महायुतीतील नेत्यांकडून या योजनेचा उल्लेख करत मते मागितली जाणार हे स्पष्ट आहे. हीच बाब ओळखून उद्धव ठाकरे व राज ठाकरेंनीही महिलांना टार्गेट केले आहे. आज प्रसिध्द करण्यात आलेल्या वचननाम्यामध्ये अनेक गेमचेंजर आश्वासने देण्यात आली आहेत. मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलांना दर महिन्याला १५०० रुपये स्वाभिमान निधी म्हणून देण्याचा शब्द ठाकरे बंधूंनी दिला आहे. मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलांची संंख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी योजना आणत ठाकरेंनी 'लाडकी बहीण' योजनेला टक्कर दिल्याचे बोलले जात आहे.
एवढेच नाही तर मच्छिमार महिला विक्रेत्यांना अर्थसहाय्य आणि नवीन परवान्यांची तरतूदही केली जाणार आहे. मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर दर २ किलोमीटरला एक अशी महिलांसाठी उत्तम स्वच्छता असलेली शौचालयं बांधणार, या स्वच्छतागृहात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन पॅड व्हेंडिंग मशिन्स, लहान मुलांचे डायपर्स बदलण्याची सोय असेल, असे वचनही देण्यात आले आहे.
नोकरदार पालक तसेच कष्टकरी महिला यांच्या लहान मुलांना सांभाळणारी पाळणाघरे सुरू करणार, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष बेस्ट बसध्ये मोफत प्रवासाचे आश्वाहनही ठाकरेंनी दिले आहे. त्याचप्रमाणे आरोग्य, शिक्षण, परवडणारी घरी, रस्ते, पाणी स्वयं-रोजगार, कोळीवाडे, बेस्ट कामगार, डबेवाले आदींसाठीही अनेक आश्वासने देण्यात आली आहेत.
वचननाम्यातील ठळक आश्वासने -
- पुढील ५ वर्षांत १ लाख मुंबईकरांना परवडणारी हक्काची घरं दिली जातील.
- कष्टकरी मुंबईकरांसाठी फक्त १० रुपयांत नाश्ता आणि दुपारचं जेवण देणारी मासाहेब किचन्स सुरू करणार.
- वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयं-रोजगार अर्थसाह्य योजना
- एक लाख तरुण-तरूणींना प्रत्येकी २५ हजार ते १ लाख रुपयांचा स्वयंरोजगार सहाय्यता निधी आणि २५ हजार गिग वर्कर्सना आणि डबेवाल्यांना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज देणार.
- मुंबई महापालिकेतील अत्यावश्यक रिक्त पदं भरणार
- मुंबईत रोजगारासाठी येऊ इच्छिणाऱ्या मराठी तरुण-तरुणींसाठी वसतिगृह उभारणार.
- ७०० चौ. फुटांपर्यतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ
- सोसायट्यांना १ लाख रूपयांची सबसिडी
- दहावीनंतरची गळती रोखण्यासाठी महापालिका शाळा इमारतीत बारावीपर्यंतचे ज्युनिअर कॉलेज सुरू करणार.
- मुंबई महापालिकेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने या देशातील सर्वात मोठं ग्रंथालय उभारलं जाईल.
- छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे नूतनीकरण करणार
- देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबई आणि महाराष्ट्राचे योगदान अधोरेखित करणारे स्वातंत्र्यसमर स्मृतीदालन उभारणार
- घरगुती वीज वापर करणाऱ्या 'बेस्ट विद्युत' च्या ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देणार.
- महापालिकेच्या वाहनतळांमध्ये पार्किंग सुविधा मोफत करणार.
- गावठाण कोळीवाड्यातील बांधकामं नियमित केली जातील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.