Kalyan News : कल्याण डोंबिवली मतदारसंघातील महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी होत असलेल्या या सभेसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा ताफा श्रीकांत शिंदे यांच्या घरासमोरून जात असताना शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या प्रकारानंतर श्रीकांत शिंदे (Shrikanat Shinde) यांच्या बंगल्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (Shivsena News )
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई, उपनगर व नाशिक परिसरातील उर्वरित १३ मतदारसंघांमध्ये २० तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे आता प्रचाराला वेग आला असून, बड्या नेत्यांनीही प्रचाराच्या या अखेरच्या टप्प्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. राज्यात शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोचला आहे. शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने प्रचार वेगात सुरु आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात गुरुवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा, तर नाशिक आणि डोंबिवलीत शिंदेंचं शक्तिप्रदर्शन होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोमध्ये त्यांनी विरोधकांवर केलेली टीका पाहता आता या टप्प्यासाठी राजकारण पुन्हा तापणार असल्याचे दिसत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कल्याण डोंबिवलीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी होत असलेल्या या सभेसाठी उद्धव ठाकरे यांचा ताफा श्रीकांत शिंदे यांच्या घरासमोरून जात असताना शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नाशिकमधील उमेदवार खासदार गोडसे यांच्या प्रचारासाठी गुरूवारी शहरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रोड शो करण्यात आला. शहरातील सिटी सेंटर मॉल येथून सुरू झालेला हा रोड शो गंगापूर रोड अशोक स्तंभ रविवार कारंजा मेन रोड मार्गे विविध भागातून गेला.हा रोड शो नाशिक शहरातील गंगापूर रोड वरून रावसाहेब थोरात सभागृहाजवळून जात होता.
त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा सामना झाला. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी '50 खोके एकदम ओके' अशा घोषणा देण्यात आल्या. हे कार्यकर्ते वारंवार घोषणा देत रोड शो मध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना हिणवत होते. ही बाब लक्षात आल्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील पक्षाचे चिन्ह उंचावत धनुष्यबाण, धनुष्यबाण अशा घोषणा देत प्रत्युत्तर दिले.