Milind Narvekar, Uddhav Thckeray  Sarkarnama
मुंबई

Shivsena News : ऐका हो ऐका, ठाकरेंच्या शिवसेनेत आनंदाची बातमी; मिलिंद नार्वेकरांना मिळाले नवे 'आयकार्ड'

Political News : आमदारकीचे नवे ओळखपत्र त्यांनी सोशल मीडियावर टाकून परत एकदा सर्वांचे आभार मानले आहेत. ओळखपत्र हे मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी व ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी ठरली असावी.

Sachin Waghmare

Mumbai News : ठाकरेंच्या शिवसेनेतील सचिव आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर दिल्लीत अर्थात राज्यसभेत जाण्याऐवजी थेट विधानपरिषदेत आले अन् आमदार झाले. मिलिंद नार्वेकरांना आमदार करण्यामागे उद्धव ठाकरे अन् त्यांच्या शिवसेनेची (Shivsena) अनेक अर्थाने खेळी असू शकते, याची चर्चा राज्याच्या राजकारणात अद्यापही सुरूच आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत जिंकल्यानंतर मिलिंद नार्वेकर हे आजतागायत फारसे सक्रिय दिसून आले नाहीत. तशी संधी नार्वेकरांना मिळाली नाही पण आमदार झाल्यानंतर मिलिंद नार्वेकर हे मंत्रालय किंवा आमदारकीच्या कामांपेक्षा ठाकरे भोवतीच अधिक दिसत आहेत. थोडक्यात काय तर मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे पक्ष संघटनेतच आपला प्रभाव पाडणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. (Shivsena News)

साडे तीन दशके ठाकरे, मातोश्री व शिवसेनेत हुकमी एक्का राहिलेले मिलिंद नार्वेकर हे आमदारकीनंतर कशी छाप पाडणार हे येत्या काळात कळेल. पण, आमदार झाल्याचा आणि आमदारकीचे ओळखपत्र मिळाल्याचा आनंद नार्वेकरांना झाला आहे. आमदारकीचे नवे ओळखपत्र त्यांनी सोशल मीडियावर टाकून परत एकदा सर्वांचे आभार मानले आहेत. ओळखपत्र हे मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी अन् ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी ठरली असावी.

महिनाभरापूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील व्यक्ती आणि सर्वपक्षीयांशी सुमधूर संबंध राखून असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी विधानपरिषद निवडणुकीत सगळ्यांचे अंदाज चुकवत राजकीय चमत्कार करुन दाखवला होता.

शिवसेनेकडे एक जागा निवडून येण्याइतपत संख्याबळ नसताना मिलिंद नार्वेकर यांना शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. शिवसेनेकडे विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी असलेले 22 मते नव्हती. त्यांच्याकडे 16 मते असताना इतर पक्षांकंडील मते खेचून त्यांनी आणली.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे या जागेसाठी चुरशीची लढत होणार हे अपेक्षित होते. महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाकडे असलेले आमदारांचे संख्याबळ पाहता 11 व्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर यांना संघर्ष करावा लागेल, असे चित्र होते. पण विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

मतमोजणी सुरु झाल्यानंतर 274 मतांची 11 गठ्ठ्यांमध्ये विभागणी करण्यात आली. या मतांची मोजणी सुरु झाली तेव्हा पहिल्या टप्प्यातच मिलिंद नार्वेकर यांनी अनपेक्षितपणे मोठी आघाडी घेतली. ही परिस्थिती पाहता मिलिंद नार्वेकर हे सर्वात पहिले विजयी होतील, असे वाटत होते. मात्र, नंतरच्या टप्प्यात मिलिंद नार्वेकर यांची गाडी 20 मतांवर जाऊन अडली. त्यानंतर मिलिंद नार्वेकर यांच्या मतांची गाडी एक-एक करुन पुढे सरकत होती. पहिल्या टप्प्यात त्यांच्यामागे असलेल्या उमेदवारांनी मुसंडी मारत विजय मिळवला. त्यानंतर सर्वात शेवटी नार्वेकर हे विजयी झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

राज्यसभेची संधी हुकली

राज्यातील महविकास आघाडीचे सरकार पडण्यापूर्वी राज्यसभेची निवडणूक झाली होती. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्यावेळी मिलिंद नार्वेकर यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्यावेळेस आयत्यावेळी घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे कोल्हपूरमधील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी मिळाली होती. त्यामध्ये मिलिंद नार्वेकरांचे नाव मागे राहिले. त्यानंतर मात्र, ठाकरे यांनी नार्वेकरांना विधानपरिषदेत पाठवून आमदार केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT