Ujjwal Nikam News Sarkarnama
मुंबई

Ujjwal Nikam News : माय लॉर्ड... उज्ज्वल निकमांचा आवाज लोकसभेत नाही,कोर्टातच घुमणार!

Deepak Kulkarni

Mumbai News : बॉम्बस्फोटापासून गाजलेल्या केसेस निकाली लावणाऱ्या आणि आपल्या वकिली स्टाइलने अनेकांना घाम फोडणारे सरकार वकील उज्ज्वल निकमांनाच मुंबईतील लढतीने घाम फोडला.म्हणजे,काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड निकमांशी नव्हेः थेट भाजपशी झुंजल्या आणि जिंकल्याही.

पण,निकम कोर्टासारखेच निवडणुकीच्या रिंगणातही जिंकण्यासाठीच लढले.मात्र,ठाकरेंचा झंझावात आणि काँग्रेसच्या पंजाने निकमांना घायाळ करून टाकले. या पराभवाने निकमांना पुन्हा कोर्टात माय लॉर्ड... म्हणत वकिली करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे.

भाजपने उत्तर-मध्य मुंबईतून भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.तेव्हापासून हा मतदारसंघ राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांविरोधात निकम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपने ही लढत अतिशय प्रतिष्ठेची केली होती.पण आता उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी उज्ज्वल निकम यांना पराभवाची धूळ चारली.अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीची राहिलेल्या या लढतीत गायकवाड सरस ठरल्या.

भाजपने अनेक दिग्गज्जांना घरी बसवून नवख्या उमेदवारांना तिकीट दिले. यातून भाजपअंतर्गत नाराजी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेल्या पूनम महाजन यांचे तिकिट कापून भाजपने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना रिंगणात उतरवले. तर काँग्रेसने धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना तिकिट देत या निवडणुकीत रंगत आणली होती.

ठाकरेंचा शब्द खरा ठरला...

वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.या भेटीनंतर ठाकरे यांनी गायकवाडांना खासदार करुन दिल्लीला पाठवणार असल्याचं म्हटलं होतं. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी पहिल्यांदा पंजाला मतदान करणार असल्याचं म्हटलं होतं.वर्षाताईंना खासदार करुन दिल्लीला पाठवणार आहे. असं ठाकरे म्हणाले होते.

अगोदर पीछेहाट नंतर विजय...

अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली. आणि शेवटच्या टप्प्यात खेचून आणला. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरु झाल्यानंतर सुरुवातीला उज्ज्वल निकम यांनी मोठी आघाडी घेतली होती. यावेळी वर्षा गायकवाड सुरुवातीला पिछाडीवर होत्या.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT