नवनीत बऱ्हाटे
Ulhasnagar Politics : दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने भाजपची कोंडी, ऐनवेळी नव्या नावांची शिफारस, त्यावर शिवसेनेचा जोरदार आक्षेप आणि सभागृहात रंगलेले राजकीय नाट्य, या सर्व घडामोडींनंतर उल्हासनगर महापालिकेच्या सात स्वीकृत नगरसेवकांची निवड अखेर बिनविरोध झाली. राजकीय संख्याबळाच्या खेळात शिवसेनेने पाच जागा मिळवल्या, तर भाजपच्या वाट्याला दोन जागा आल्या.
उल्हासनगर महापालिकेतील बहुचर्चित सात स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवर अखेर गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी शिक्कामोर्तब झाले. छाननी प्रक्रियेपासून ऐनवेळच्या शिफारशीपर्यंत रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर शिवसेनेचे पाच आणि भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले. भाजपकडून धनंजय बोडारे, राजेंद्र श्रीखंडे, कपिल अडसूळ आणि प्रदीप रामचंदानी यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र छाननी दरम्यान तांत्रिक त्रुटींमुळे अडसूळ आणि रामचंदानी यांचे अर्ज बाद झाल्याने भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला. त्यानंतर भाजपने महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याकडे ऐनवेळी दोन नव्या नावांची शिफारस केली. याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले.
शिवसेनेचे सभागृह नेते अरुण आशान आणि नाना बागुल यांनी या प्रक्रियेवर जोरदार आक्षेप घेत, छाननी पूर्ण झाल्यानंतर नवीन नावे स्वीकारणे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला. त्यावर आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी शिफारस पुढे पाठवली असली तरी ती स्वीकारणे अथवा फेटाळणे हा सभागृहाचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर महापौरांनी पत्र स्वीकारल्याने निवडीचा मार्ग मोकळा झाला.
अखेरीस शिवसेनेकडून पंचम कालानी, रमेश चव्हाण, हेमा पिंजानी, निलेश बोबडे आणि आशा पवार (वंचित बहुजन आघाडी), तर भाजपकडून धनंजय बोडारे आणि राजेंद्र श्रीखंडे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली. वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे आशा पवार यांना शिवसेनेच्या कोट्यातून संधी मिळाली. अर्जांच्या छाननीपासून अंतिम निवडीपर्यंत रंगलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे ही निवड उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.
१. पंचम कलानी
२. रमेश चव्हाण
३. हेमा पिंजानी
४. निलेश बोबडे
५. आशा पवार (वंचित बहुजन आघाडी पाठिंबा)
१. धनंजय बोडारे
२. राजेंद्र श्रीखंडे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.