Omie Pappu Kalani : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहुल लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरच्या राजकारणातही जोरदार घडामोडी घडत आहेत. काही काळ शांततेत असलेली आणि विश्रांती मोडमध्ये गेलेली 'टीओके कोअर कमिटी' अर्थात टीम ओमी कलानी पुन्हा सक्रिय झाली असून बैठकांचे सत्र सुरु आहे. टीओकेकडून रणनीती आखली जात आहे आणि शहराच्या विकासाच्या अजेंड्याभोवतीचे प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत. टीम ओमी कलानी बैठकांमध्ये सध्या शहरहिताचे मुद्दे केंद्रस्थानी आहेत.
एका बाजूला बैठकांचे सत्र सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला मोठा प्रश्न हा आहे की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कलानी यांची युती कोणासोबत होणार? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत असलेले कलानी आता भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासोबत युती करतील का? की पुन्हा आपली निष्ठा जुन्या पक्षासोबत जपतील? याची उत्सुकता लागली आहे.
2014 मध्ये ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि जिंकली. पण 2017 मध्ये भाजप आणि ओमी कलानी यांनी एकत्र येत महापालिका निवडणूक लढवली होती. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ओमी कलानी यांना उमेदवारी नाकारली आणि तिथूनच नाराजीची ठिणगी पडली. कलानी यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढवली. यानंतर कलानी कुटुंबाने उल्हासनगर महापालिकेतील भाजपच्या सत्तेला आव्हान दिले. भाजपच्या महापौरालाच हटवून आपली ताकद दाखवून दिली होती.
2024 च्या विधानसभा निवडणुकीतही ओमी कलानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यावेळी 50 हजार मते घेत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. त्यानंतर काही काळ त्यांनी राजकीय विश्रांती घेतली होती. पण आता पुन्हा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलानी कुटुंब सक्रिय झाले आहेत. गत महिन्यात पप्पू कलानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदंचद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यामुळे ते शरद पवार यांच्यासोबत राहणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कलानी कुटुंबाने शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले सौहार्दपूर्ण संबंध ओमी कलानी यांच्यासाठी भविष्यात युतीचा पर्याय बनू शकतात, असे राजकीय विश्लेषक सांगतात. पण भाजपनेही 2029 च्या लोकसभेची निवडणूक समोर ठेवून आताच हालचाली सुरू केल्या आहेत. ओमी कलानी यांची राजकीय ताकद लक्षात घेता, भाजप त्यांना पुन्हा पक्षात आणण्याच्या विचारात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.