Bhaskar Jadhav, devendra Fadnavis

 

Sarkarnama

मुंबई

भास्कर जाधवांनी मोदींची नक्कल केली अन् फडणवीस भडकले

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जाधव यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत मोठा गदारोळ झाला.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विधीमंडळ अधिवेशनाच्या (Assembly Winter Session) पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली खडागंजी झाली. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविषयीच्या वक्तव्यावरून सभागृहात जोरदार गदारोळ झाला. पंतप्रधानांची नक्कल केल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपचे सर्वच आमदार आक्रमक झाले. जाधव यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना निलंबित करण्याची मागणी विरोधकांनी उचलून धरली. विरोधक माघार घेण्यास तयार नसल्याने सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलं.

वीजबिलाच्या मुद्यावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) विधानसभेत उत्तर देत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 15 लाख रुपयांच्या घोषणाचा उल्लेख केला. त्यावर फडणवीस यांनी आक्षेप घेतला. राऊत यांनी याचे पुरावे द्यावेत, अन्यथा माफी मागावी, असं खुलं आव्हान फडणवीस यांनी दिलं. फडणवीस आक्रमक झाल्यानंतर भास्कर जाधव राऊतांच्या मदतीसाठी धावून आले.

जाधव म्हणाले, विरोधी पक्षनेते शब्दखेळ करत आहेत. 2014 पूर्वी पंतप्रधान हे बोलले आहेत. 'काला धन लाने का की नही लाने की, कहा रखने का,' असं मोदी म्हणाल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यानंतर फडणवीस पुन्हा आक्रमक झाले आणि पंतप्रधानांची नक्कल करणाऱ्या भास्कर जाधवांना निलंबित करा. बहुमताच्या भरवशावर अशी नक्कल करत असाल तर त्याची लाज वाटली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

पंतप्रधानांनाबाबतचे अंगविक्षेप जे करत आहेत, ते सहन केले जाणार नाही. आम्हीही उद्या यांच्या नेत्यांची नक्कल केली तर सभागृहाला चालेल का. देशाचे पंतप्रधानांबाबत असं बोलणं सहन केले जाणार नाही. जाधव यांनी माफी मागितली पाहिजे. तुमच्या नेत्यांचा आम्ही अवमान करायचा का, आम्हालाही नकला येतात. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान जाधव करत असतील तर ते सहन केले जाणार नाही. असे फडणवीस म्हणाले. यावेळी भाजपचे सर्व आमदार गोळा झाले आणि त्यांनी माफी मागा माफी मागा, अशी घोषणाबाजी सुरू केली.

त्यावर जाधव यांनी खुलासा करताना 15 लाख रुपये पंतप्रधान असे कधी बोलले नाही. ते पंतप्रधान होण्यापूर्वी बोलले. याचा अर्थ मी पंतप्रधानांची नक्कल केली नाही. एका उमेदवाराची नक्कल केली आहे, असे म्हटले. अखेर विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून जाधव यांनी अंगविक्षेप व शब्द मागे घेत असल्याचे जाहीर केले. पण त्यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. जाधव यांनी माफी मागण्याची मागणी त्यांनी लावून धरली. अखेर गदारोळ वाढत गेल्याने सभागृहाचे कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT