Uddhav Thackeray interacts with party leaders during a key meeting as the absence of four Shiv Sena UBT MLAs fuels political speculation. sarkarnama
मुंबई

Shivsena Politics : फुटलेल्या खासदारांनी आनंद दिघेंचा आदर्श आठवावा, निधी नसताना..., ठाकरेंच्या नेत्याने साधला निशाणा

Vijay Salvi Shivsena : निधी मिळत नसल्याचे कारण पुढे करून पक्ष सोडणाऱ्यांनी दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, अशी टीका साळवी यांनी केली आहे.

शर्मिला वाळुंज

Vijay Salvi News : ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांच्या पक्षांतराच्या चर्चांवरून राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी संबंधित खासदारांवर जोरदार टीका केली आहे. निधी मिळत नसल्याचे कारण पुढे करून पक्ष सोडणाऱ्यांनी दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे साळवी यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात समाज माध्यमातून प्रसिद्ध केलेल्या पोस्ट मध्ये साळवी यांनी म्हटले की, शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात पक्षाकडे सत्ता नव्हती, मंत्रीपदे नव्हती आणि निधीचीही उपलब्धता नव्हती. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवून हजारो शिवसैनिक जनतेची कामे करण्यासाठी रात्रंदिवस झटत होते. ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनीही कोणतीही सत्तेची ताकद नसताना समाजकारणाचा मोठा आदर्श निर्माण केला.

साळवी यांनी म्हटले की, मे-जून महिन्यात आनंद दिघे ठाणे जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी लाखो वह्यांचे वाटप करीत असत. विविध सामाजिक उपक्रम राबवत सामान्य नागरिकांशी त्यांचा सातत्याने संपर्क असायचा. त्यावेळी त्यांनी कधी निधी नाही किंवा सत्ता नाही म्हणून तक्रार केली नाही. शिवसैनिकांनीही कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता समाजकारणाला प्राधान्य दिले.

ठाकरे गटातील खासदारांना जनतेने उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर निवडून दिले होते. मात्र आता हेच खासदार निधी मिळत नसल्याचे कारण देत पक्ष सोडत असतील, तर तो जनतेच्या विश्वासाचा आणि जनादेशाचा अपमान असल्याची टीका साळवी यांनी केली. "लोकांनी शिवसेनेच्या विचारांवर विश्वास ठेवून त्यांना संसदेत पाठवले. त्यामुळे पक्षांतराचा निर्णय घेताना जनतेच्या भावनांचाही विचार व्हायला हवा," असे ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेल्या 'ऑपरेशन टायगर' मोहिमेचाही त्यांनी उल्लेख केला. लोकनियुक्त प्रतिनिधींना पक्षांतरासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी जनतेला सर्व घडामोडींची जाणीव असल्याचे म्हटले.

"शिवसेना ही केवळ सत्ता मिळविण्याचे साधन नाही, तर ती एक सामाजिक आणि राजकीय चळवळ आहे. काही लोक पक्ष सोडून गेले तरी विचार आणि निष्ठा कायम राहते," असे सांगत साळवी यांनी आनंद दिघे यांच्या कार्याची आठवण करून दिली. या पत्रकामुळे ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य फुटीवर पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT