Vijay Wadettiwar Sarkarnama
मुंबई

Vijay Wadettiwar News : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका ; म्हणाले, 'मर्जीतील अधिकाऱ्यांचे...'

Amol Sutar

Appointment of Officers : सरकारकडून केडर नसलेल्या अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे. सरकारकडून महत्त्वाच्या पदांचे अवमूल्यन केले जात असून मर्जीतील अधिकाऱ्यांचे सरकार लाड पुरवतंय, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे. तर नियम डावलून केलेल्या नियुक्त्या रद्द कराव्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Vijay Wadettiwar criticizes the government)

कमाल नागरी जमीन धारणा (युएलसी) घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावल्याने ज्यांची चौकशी झाली, असे अधिकारी दिलीप ढोले यांची नुकतीच शासनाने सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती केली आहे. तर बृहन्मुबंई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे यांची नियुक्ती शासनाने केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, वास्तविक ढोले हे राज्य कर उपायुक्त (वस्तू व सेवाकर) या विभागातील अधिकारी आहेत. ते पद वर्ग - 1 दर्जाचे आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती असल्याने आस्थापना विषयक सर्व नियम डावलून सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको या भारतीय प्रशासकीय सेवेतील समकक्ष पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वीही ढोले यांची मीरा - भाईंदर महापालिकेतही सर्व नियम डावलून आयुक्तपदी शासनाने नियुक्ती केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भा.प्र.से. केडरच्या पदावर भा.प्र.से. सेवेत नसलेल्या अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य नियुक्तीमुळे सनदी सेवेतील अधिकाऱ्यांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होत आहे. बृहन्मुबंई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे यांची नियुक्ती केली आहे. वास्तविक शिंदे हे भारतीय प्रशासकीय सेवतील अधिकारी नसून ते भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत.

असे असतानाही इतर वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना डावलून केवळ राजकीय पाठबळ आहे म्हणून शिंदे यांना एवढ्या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती देणे हे चुकीचे आहे. यामुळे वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. अशा नियुक्त्यामुळे काही अधिकाऱ्यांची पदोन्नती होत नाही. त्यामुळे मर्जीतील अधिकाऱ्यावर मेहेरबान होऊन केलेली नियुक्ती सरकारने तात्काळ रद्द करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT