Ranjitsinh Mohite-Patil, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Solapur News: पाण्यासाठी गावाची मतदान न करण्याची शपथ; रणजितसिंह मोहिते-पाटलांची लक्षवेधी अन् फडणविसांचे उत्तर

Ranjitsinh Mohite-Patil : बंद जलवाहिनीनंतर दुष्काळग्रस्त गावांना पाणी देण्याची मागणी

सरकारनामा ब्युरो

Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील बचेरी गावातील सर्व नागरिकांनी पाणीटंचाईमुळे आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची शपथ घेतली आहे. त्यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज विधानपरिषदेत तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना बंद जलवहिनीतून पाणी देण्याची मागणी केली.

सोलापूर जिल्ह्याला निरा देवघर आणि निरा उजवा कलव्याच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र तो दोन्ही खोऱ्यातील माळशिरससह चार तालुक्यातील काही गावे वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित आहेत. त्या गावांना बंद जलवाहिनीतून येणाऱ्या पाण्याचा लाभ होणार का, असा प्रश्न आमदार मोहिते-पाटील यांनी उपस्थित केला. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिल्याचे सांगून अभ्यासानंतर संबंधित गावांचाही विचार करू, असे आश्वासन दिले.

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) म्हणाले, "निरा उजवा कालवा आणि निरा देवघरच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र उघड्या कालव्यामुळे या दोन्ही खोऱ्यातील काही गावे वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित राहत आहेत. त्यात माळशिरस तालुक्यातील १४ गावांचाही समावेश आहे. आता बंद जलवाहिनीद्वारे पाणी देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पाणी शिल्लक राहणार आहे. हे शिल्लक पाणी माळशिरसमधील पाण्यापासून वंचित गावांना मिळणार का?"

यावर उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या गावांचा अभ्यासानंतर समावेश करू, असे आश्वासन दिले आहे. फडणवीस म्हणाले, "सुरवातीच्या काळात कालव्यांच्या माध्यमातून पाणी कुठपर्यंत पोहचू शकते त्याच भागाचा विचार केला होता. त्याच भागांना पाणी दिले गेले. त्यानंतर आता कुठल्या गावांपर्यंत लाभक्षेत्र वाढू शकते, याचाही विचार केलेला आहे.

आता पाणी वाढल्यानंतर लाभक्षेत्राचा विस्तारही वाढला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. सध्या आहे त्या लाभक्षेत्राला मिळाल्यानंतर पाणी वाचत असेल तर आणखी लाभक्षेत्रात वाढ केली जाईल. त्यास आमचा नकार नाही. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मागणीला तत्वतः मान्यता दिली आहे. आता त्याबाबत नीट अभ्यास करावा लागेल. अभ्यास करताना आता सूचविलेल्या गावांचाही आपण विचार करू."

माळशिरस (Malshiras) तालुक्यात कायम दुष्काळी २२ गावे आहेत. त्यातील १० गावांचा निरा देवघर योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.आमदार राम सातपुते (Ram Satpute) व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, २२ पैकी उर्वरित १२ गावांचा या योजनेत समावेश झालेला नाही. त्यामध्ये बचेरी या गावाचाही समावेश आहे.

बचेरी गावाचा पाण्याचा प्रश्न तीव्र आहे. येथील शेतीच्या पाण्यासाठी स्वातंत्र्यानंतर एकाही नेत्याने प्रयत्न केला नसल्याचा आरोप नागरिकांचा आहे. निरा देवघर योजनेत बचेरी गावाचा समावेश करावा, यासाठी येथील दोन हजार नागरिकांनी जल दिन व गुढीपाडव्याचे औचित्य साधून ईश्वरसाक्षीने शपथ घेऊन पुढील होणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT