Chandrakant Patil-Nana Patole
Chandrakant Patil-Nana Patole Sarkarnama
मुंबई

Patole on Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांची आम्हाला चिंता वाटते : नाना पटोले असं का म्हणाले?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी माझ्यासह काही राजकीय नेत्यांवर आगपाखड केली. माझा ऐकरी उल्लेख करून मलाच चर्चेचे आव्हान दिले. पाटील यांची आगपाखड पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे दिसत असून त्यांची आम्हाला चिंता वाटत आहे, त्यांनी लवकरात लवकर चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. चंद्रकांत पाटील व भाजपच्या वाचाळ नेत्यांना गणपतीबाप्पा सुबुद्धी देवो, अशी मी प्रार्थना करतो, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिले. (We are worried about Chandrakant Patil : Nana Patole)

मंत्री पाटील यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा उभ्या केल्या, असे विधान केले होते. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

नाना पटोले म्हणाले की, निवडणुकीवेळी महापुरुषांचे आशीर्वाद घेऊन मतांची भीक मागणारे भारतीय जनता पक्षाचे नेते निवडणुका संपल्यानंतर मात्र याच महापुरुषांचा अपमान करतात. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करण्यात भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसत आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या या नेत्यांवर भाजपने कारवाई केली नाहीच; पण साधा निषेध करण्याचे अथवा समज देण्याचे सौजन्यही दाखवले नाही. उलट या ‘महनीय’ व्यक्तींना पंतप्रधानांच्या बाजूला सन्मानाने उभे केले जाते, हा महाराष्ट्राचा व आमच्या दैवतांचा अपमान आहे. भाजपचे महापुरुषांच्याबाबत खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत, हेच यातून दिसत आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. सुधांशु त्रिवेदी या प्रवक्त्यानेही अपमान करणारे वक्तव्य केले, तर पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना राजकीय बंडखोरांशी केली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान केला जात आहे. जनतेतून त्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे परंतु भारतीय जनता पक्षाने या नेत्यांवर कारवाई केली नाही उलट या नेत्यांचा भक्कमपणे बचाव केला, असेही पटोले यांनी नमूद केले.

भारतीय जनता पक्षाचे नेते निर्ढावलेले आहेत, महापुरुषांबद्दल बोलताना ते कोणताही विधिनिषेध पाळत नाहीत. पण महापुरुषांचा अपमान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे आणि त्याचे त्यांना काहीही वाटत नाही. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूरमधील कार्यक्रमात शेजारी सन्मानाने बसवले. महापुरुषांचा अपमान करणाऱ्याला पंतप्रधान मोदींनी चार खडेबोल सुनावले असते, तर पंतप्रधानांबद्दल आम्हाला आदरच वाटला असता. पण, महापुरुषांपेक्षा भाजपला त्यांचे नेते मोठे वाटतात, असेच खेदाने म्हणावे लागते. महापुरुषांची बदनामी करण्याचे हे भाजपचे नियोजित षडयंत्र असून महापुरुषांची बदनामी करण्याचा भाजपचा अजेंडा राज्यपाल चालवत आहेत, असा आरोपही पटोले यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT