मुंबई : तुम्ही एवढं सुंदर भाषण करता. पण, तुमच्या जिल्ह्यातून तुमच्याशिवाय दुसरं कोणी निवडूनच येत नाही. बाबांनो, तुम्ही मार्गर्शन जरूर करा; पण तुमच्या जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) जास्तीत जास्त ताकद कशी मिळेल, यासाठी आपापसांतील मतभेद मिटवून टाका. साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुणाची बिनपाण्यानं करायची, असं मी ठरवलं नव्हतं. पण, खरं आहे ते बोललं पाहिजे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोरच राष्ट्रवादीच्या नेत्यांची हजेरी घेतली. (Ajit Dada told NCP leaders in front of Sharad Pawar)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आज (ता. १२ डिसेंबर) मुंबईत साजरा करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावले.
अजित पवार म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार आता ८३ व्या वर्षांत पर्दापण करत आहेत. आपण सांगतो, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. पण, राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याने आपल्या स्वतःच्या जिल्ह्यातून आमदार होताना स्वतःबरोबर काही आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करा. असं झालं तरच आपण (राष्ट्रवादी) पहिल्या क्रमांकावर जाऊ. यामध्ये अपवाद नाशिक आणि बीड जिल्हा आहे. तसेच, दिलीप वळसे पाटील पुणे जिल्ह्याचे असल्याने पुणे जिल्हा आहे.
तुम्ही एवढं सुंदर भाषण करता. पण, तुमच्या जिल्ह्यातून तुमच्याशिवाय दुसरं कोणी निवडूनच येत नाही. मी आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुणाची बिनपाण्यानं करायची ठरवलं नव्हतं. पण, खरं आहे ते बोललं पाहिजे. शेवटी खरा बोलणारा म्हणून माझी महाराष्ट्रात ओळख आहे. बाबांनो, मार्गदर्शन जेव्हा करायचं तेव्हा करा. मी जेव्हा मार्गदर्शन करत असतो, तेव्हा माझ्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कशी मिळेल, यासाठी मी, दिलीपराव जिवाचं रानं करतो. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या जिल्ह्यांतील नेत्यांनी पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक शपथ घ्या की, आपल्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही मतभेद आहेत, ते सर्व मतभेद संपवून टाकायचे. त्यामध्ये एखाद्या नेत्याला दोन पावलं मागं यावं लागलं तरी चालेल, त्याने काहीही बिघडत नाही, असेही अजित पवार यांनी नमूद केले.
अजितदादा म्हणाले की, शरद पवार यांनी नेहमी बेरजचे राजकारण केलेले आहे. हे बेरजेचे राजकारण करत असताना आपल्याला आपला पक्ष पहिल्या क्रमांकावर न्यायचा म्हटलं तर आपल्या पक्षात, आपल्या घरात थोडं पुढं मागं करावं लागणार आहे. त्याची नोंद आज बोलणारे नेते आणि जे बोलू शकले नाहीत, त्यांनीही घ्यावी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.