Prakash Shendge Sarkarnama
मुंबई

Prakash Shendge : आदिवासींचे आम्हाला काही नको; पण बारामतीसुद्धा राखीव होईल : धनगर नेत्याने मांडली भूमिका

Vijaykumar Dudhale

Mumbai, 04 October : झिरवाळसाहेब, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका आणि आपल्या आदिवासी समाजाचाही गैरसमज होऊ देऊ नका. धनगर समाजाला आदिवासींचे काहीही काढून घ्यायचे नाही किंवा घुसखोरी करायची नाही. आदिवासी समाजाला मिळणारे सात टक्के आरक्षण कायम ठेवून धनगर समाजाला मिळणाऱ्या साडेतीन टक्के आरक्षणाचा उपवर्ग तयार करून आम्हाला आदिवासींप्रमाणे सवलती द्याव्यात, अशी आमची मागणी आहे.

धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू केले तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील धनगर बहुल भागात आमचे लोकप्रतिनिधी वाढतील. अगदी बारामती मतदारसंघसुद्धा राखीव होईल, अशी प्रतिक्रिया धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली.

आदिवासी समाजाच्या आमदारांनी (Tribal Community MLA) मंत्रालयात जाळीवर उड्या मारून आंदोलन केले. त्यावर प्रतिक्रिया देताना माजी आमदार शेंडगे यांनी आदिवासी समाजाच्या नेत्यांना एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, आदिवासी आमदारांनी आंदोलन केले, त्या वेळी मीही मंत्रालयातच उभा होतो. पेसा अंतर्गत भरतीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी आमदारांनी आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भेटीची वेळ दिली आहे.

धनगर आरक्षणाच्या मुद्यावर मी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन त्यांना लेखी पत्र दिले आहे. आदिवासी समाजाचा एक टक्काही निधी आम्हाला नको आहे. त्यांचा निधी आम्हाला घ्यायचा नाही, त्यांचे राजकीय आरक्षणही आम्हाला घ्यायचे नाही. आदिवासी बहुल गावात धनगर समाजाची ग्रामपंचायतसुद्धा नाही. त्यामुळे आमचा आदिवासी समाजात समावेश करण्यात आला, तर त्यांचा एकही आमदार कमी होणार नाही, असा दावा प्रकाश शेंडगे (PrakashShendge) यांनी केला.

धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू केले तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील धनगर बहुल भागात आमचे लोकप्रतिनिधी वाढतील. अगदी बारामती मतदारसंघसुद्धा राखीव होऊन जाईल. आदिवासी बांधवांना आम्हाला काहीही दुखावायाचे नाही.

आदिवासी आणि धनगर समाज एकोप्याने राहिला, तर महाराष्ट्रात राजकीय क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीही आदिवासी होऊन जाईल. ही आमची भूमिका मान्य करण्यासाठी मी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना हात जोडून विनंती केली आहे, असेही शेंडगे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मी नरहरी झिरवाळ यांना मंत्रालयाच्या गेटवर भेटलो. दोन समाजात चुकीचा संदेश जाऊ नये, अशी विनंती केली. आमची भूमिका समजून सांगितली पाहिजे, पण त्यांनी आम्हाला वेळच दिली नाही. झिरवाळ यांच्याकडे असणारे विधानसभा उपाध्यक्ष हे घटनात्मक पद आहे.

नरहरी झिरवाळ यांच्याकडे विधानसभेचे उपाध्यक्ष हे घटनात्मक पद आहे. मुख्यमंत्र्यांना निर्देश देऊन ते चर्चेला बोलावू शकतात. आदिवासी समाजाने आणि त्या समाजाच्या आमदारांनी आमची भूमिका समजून घेतली पाहिजे. नुसती आंदोलनं करायची आणि समाजाला भडकावणे योग्य ठरत नाही. बसून चर्चा करूयात. आमच्याकडून काही चुकत असेल तर तसं आम्हाला सांगा. आम्ही ती मान्य करू, असेही प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज आम्ही भेट घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी पंधरा दिवसांत धनगर आणि धनगड समाज एकच आहे, असे परिपत्रक काढण्यात येईल, असे सांगितले होते. त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही मंत्रालयात आलो आहोत, असेही प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT