Mumbai, 23 February : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर आजपासून पहिलेच अधिवेशन होत आहे. दादांच्या अपघाती मृत्यूवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला. बोलणं कुठून सुरू करावं, असा माझ्या मनात प्रश्न आहे. प्रचंड वादळ मनात तयार झालं आहे, अशी सुरुवात करून अपघाताच्या आदल्या दिवशी २७ जानेवारी रोजी कॅबिनेट बैठकीत नेमकं काय घडलं होतं. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या ॲण्टी चेंबरमध्ये पाऊण तास काय चर्चा झाली होती आणि ती भेट शेवटची ठरेल, असं वाटलं नव्हतं, अशा आठवणी फडणवीसांनी सांगितल्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (ता. २३ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी अजितदादांच्या शोकप्रस्तावावर फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, अजितदादांच्या मृत्यूच्या शोकप्रस्तावावर व्यक्तव्हावं लागेल, असा विचारसुद्धा कधी मनात आला नव्हता. सभागृह कितीही काळ चाललं तरी ते शेवटपर्यंत आपल्या जागेवर बसलेले असायचे. ते आपल्यात नाहीत, याची खंत आहे.
अजितदादांनी (Ajit Pawar) या वेळी बारावा अर्थसंकल्प मांडला असता, पुढच्या वर्षी तेरावा अर्थसंकल्प मांडून बॅ. शेषेराव वानखेडे यांच्या विक्रमाची बरोबरी केली असती. कदाचित पुढच्या काळात महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री म्हणून अजितदादांची नोंद झाली असती. पण दादा अचानकपणे आपल्यातून निघून गेले अणि या वेळी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ माझ्यावर आली, असे फडणवीस यांनी नमूद केले.
ते म्हणाले, कठोर निर्णय घ्यायला कधीही मागेपुढे न पाहणारे अजित पवार होते. लाडकी बहीण योजनेचा भार अर्थसंकल्पावर पडेल, म्हणून त्याचा पुनर्विचार करावा, असे सूचविल्यानंतरही ठामपणे निर्णय घेऊन तो विषय मंत्रिमंडळापुढे आणणारे अजितदादा होते. लाडकी बहीण योजनेनंतर त्यांनी गुलाबी जाकीट घालायला सुरुवात केली होती आणि आम्हालाही ते घालायाला लावले होते.
अजितदादांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडणं, हा माझ्यासाठी भावनिक प्रसंग आहे. दादांचा मृत्यू म्हणजे आपल्या सर्वांच्या हृदयाला वेदना देणारा प्रसंग आहे. दादांच्या मृत्यूची वेदना ही कायम राहणारी आहे. अजितदादांच्या मृत्यूची पोकळी न भरून येणारी आहे. प्रत्येक गोष्टी शिस्तीत झाली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
ते म्हणाले, माझा आणि दादांचा जन्म २२ जुलैचा. ते माझ्यापेक्षा ११ वर्षांनी मोठे होते, त्यामुळे ते माझे खऱ्या अर्थाने दादा होते. गेल्या दशकापासून आमची जवळीक होती. आमच्यात चांगली मैत्री होती. पण २०१४ नंतर माझ्या आणि दादांमध्ये भावनिक नातं तयार झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस ‘स्ट्रॅटेजिक पार्टनर’ आहे, असे मी अनेकदा म्हणायचो, त्याचवेळी मनातून मला पक्कं माहिती होतं. अजितदादा हे काही ‘स्ट्रॅटेजिक पार्टनर’ नाहीत तर अंतकरणातून आपल्यावर प्रेम करणारा आपला मित्र म्हणून मी त्यांच्याकडं पाहिलं. त्यांनीही माझ्याकडं त्याच दृष्टीनं पाहिलं होतं. आमचं ते नातं दादांच्या अखेरच्या श्वासापर्यंत कायम होतं.
मुख्यमंत्री म्हणाले, मला आठवतंय की, २७ जानेवारी २०२६ रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर पायाभूत सुविधांची बैठक झाली. त्यातही बैठकीत अजितदादांनी आपल्या नेहमीच्या शैलीत उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना ‘मी आज सकाळी माहिती घेतली आहे. ज्या पद्धतीने 'कॅपिटल इन्स्पेक्टेचर'मध्ये ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन काही राज्यांमध्यं होतं. तेवढं आपल्या राज्यात का होत नाही. त्या संदर्भात तुम्ही काय कार्यवाही करणार आहात,’ असा सवाल केला होता. त्यावर अधिकाऱ्यांनी ‘कॉस्ट ओव्हररन’ कसं होतं. प्रोजेक्ट कसे डिले होतात, त्यामुळे ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन का होत नाही, असं स्पष्टीकरण दिलं हेातं.
त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचं एक प्रेझेंटेशन झाले. त्यात अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका प्रकरणात ७०० कोटी रुपयांची डिक्री न्यायालयाने केली होती. ती उच्च न्यायालयातून कशी रद्द करून आणली आणि ज्यांनी डिक्री आणली होती, त्यांनाच कसा फाईन झाला, असे पद्धतीचे प्रेझेंटशन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं होतं. त्यावर दादा गंमतीनं असं म्हणाले होते, पुढच्या वेळेपासून तुम्ही फक्त असेच प्रस्ताव आणत जा, अशी आठवणही फडणवीसांनी सांगितली.
ते म्हणाले, बांधकाम विभागाची ती बैठक संपवून आम्ही माझ्या ॲण्टी चेंबरमध्ये गेलो. अजितदादांचं काम फक्त १० ते १५ मिनिटांचं असायचं. त्यांची एक सवय होती, कुठलंही काम कागदावर लिहिलेले असायचे. दोन ते तीन ओळीत काय बोलायचं आहे, हे असायचं. ते कामाचं तेवढचं बोलायचं. त्यानंतर आम्ही पाऊण तास गप्पा मारल्या. त्या वेळी पुसटशीही कल्पना नव्हती की, कदाचित हीच आपली आणि अजितदादांची शेवटची भेट ठरेल आणि दुर्दैवानं तसंच घडलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.