Mumbai, 18 August : शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करत आहेत. विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या संदर्भात दिलेल्या निर्णयाची ॲड सिब्बल यांनी सुनावणीदरम्यान चिरफाड केली. शिवसेना कोणाची याबाबतचा निर्णय देताना नार्वेकरांनी आपले अधिकारक्षेत्र ओलांडल्यांचा दावा ॲड सिब्बल यांनी केला आहे. त्याला विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी उत्तर देत आपलाच निर्णय कायम राहणार असल्याचा दावा केला आहे, त्यामुळे नार्वेकरांच्या विधानाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी फूटून जाऊन वेगळी चूल मांडली. त्यानंतर राज्यात सत्ताबदल होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पण पक्षाविरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना आपत्र करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्याची सध्या सुनावणी सुरू असून ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची चिरफाड करताना दिसत आहेत.
कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादावर बोलताना विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी मात्र आपलाच निर्णय कायम राहील, असा दावा केला आहे. ते म्हणाले, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल हे त्यांच्या पक्षकरासाठी (शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्ष) युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात यातून काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, जो निर्णय दिला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकषांच्या आधारेच मी निर्णय दिला आहे.
ॲड सिब्बल हे स्वाभाविकपणे त्यांच्या अशिलाची किंवा ज्यांची बाजू लढवत आहेत, त्यासंदर्भात ते युक्तीवाद करत आहेत. त्याचा अर्थ ते म्हणतात ते सत्य आहे, असा होत नाही, असा दावा ॲड राहुल नार्वेकर यांनी केला.
ॲड नार्वेकर म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी काय ठरवलं, हा पहिला प्रश्न आहे. त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप करून काही फरक पडत नाही. मी दिलेला निर्णय अत्यंत शाश्वत निर्णय आहे, त्यामुळे त्यात कोणता बदल होईल, असे मला वाटत नाही.
कपिल सिब्बलांनी सुनावणीत काय म्हटलंय?
एकनाथ शिंदे गटाचा व्हिप लागू होऊ शकत नाही, तरीही व्हीप लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी दहाव्या अनुसूचीअंतर्गतचे आपले अधिकारक्षेत्र ओलांडले. विधानसभा अध्यक्षांनी जे काही केले ते त्यांच्या कार्यकक्षेत येते का? बहुसंख्य आमदार म्हणजेच संपूर्ण राजकीय पक्ष, असा विधानसभा अध्यक्षांचा निष्कर्ष असल्याचा दावा करून सिब्बल म्हणाले, विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.