Sunny Deol-Nitin Desai- Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Nitin Desai Case : सनी देओलला एक न्याय अन्‌ आमच्या नितीन देसाईंना वेगळा न्याय का?; संजय राऊतांचा सवाल

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : दिल्लीतून सूत्र हलविण्यात आली आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार तथा सिनेअभिनेते सनी देओल यांच्या बंगल्याचा लिलाव अवघ्या २४ तासांत रोखण्यात आला. पण, हाच न्याय आमच्या नितीन देसाई यांना का लावण्यात आला नाही. देसाई हेही दिल्लीत भाजप नेत्यांना भेटले. मात्र, त्यांना मदत करण्यात आली नाही, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. (Why one justice for Sunny Deol and another justice for our Nitin Desai? : Sanjay Raut)

संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे खासदार, अभिनेता सनी देओल यांच्या मुंबईतील बंगल्याचा लिलाव बॅंक ऑफ बडोदा करणार होती. जवळपास ६० कोटी रुपयांचे कर्ज ते फेडू शकले नव्हते, त्यामुळे बॅंकेने त्यांच्या बंगल्याचा लिलाव करण्याचे जाहीर केले होते. सनी देओल यांच्याशी आमचा वैयक्तीक पातळीवर वाद नाही. ते चांगले अभिनेता आहेत. पण, दिल्लीतून सूत्र हलविण्यात आली आणि केवळ चोवीस तासांत त्यांच्या बंगल्याचा लिलाव रोखण्यात आला. त्यांचा बंगला आणि त्यांनाही वाचविण्यात आलं. पण, हाच न्याय आमच्या नितीन देसाई यांना का लावला नाही.

कला दिग्दर्शक नितीन देसाई हे आत्महत्येच्या आधी दोन दिवस त्यांचा कर्जतचा स्टुडिओ वाचविण्यासाठी मी कर्ज फेडणार आहे, मला मुदत द्या; म्हणून भाजपच्या अनेक महत्वाच्या नेत्यांना भेटले होते. ‘माझं स्वप्न वाचवा,’ असं म्हणून त्यांनी त्यांच्यापुढे डोळ्यांतून पाणी काढलं, असं तेथील लोक म्हणतात. पण, त्यांना वाचविण्यात आलं नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, नितीन देसाई हे दिल्लीतून आले आणि त्यांनी कर्जतमधील आपल्या स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं. भाजपचे खासदार आणि स्टार प्रचारक असलेल्या सनी देओलला एक न्याय आणि आमच्या नितीन देसाईंना वेगळा न्याय.

चार-चार, पाच-पाच हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचे विषय पुढे येत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. भाजपशी संबंधित लोकांची हजारो कोटी रुपयांची कर्जे माफ करण्यात आली आहेत. पण नितीन देसाई यांच्याबाबत असा निर्णय घेतला गेला नाही. त्यांना मरू दिलं गेलं. देसाई यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं, असेही राऊत यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT