Sangola News : सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार सांगोल्याचे शहाजीबापू पाटील सध्या तालुक्यासाठी निधी खेचून आणण्यात यशस्वी होत आहेत. अनेक योजना त्यांच्या प्रयत्नांतून पुन्हा सुरू होत आहेत. पण, तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असतानाही नीरा उजवा फाटा क्रमांक आठला अद्यापही पाणी मिळाले नाही. नियमानुसार ‘टेल टू हेड’ पाणी वाटप असताना येथील लाभक्षेत्राला पाणी का मिळत नाही? असा प्रश्न शेतकरी विचारत ‘बापू, आता निधी नको, पाणी द्या!’ असे उघडपणे बोलू लागले आहेत. ('Shahajibapu, don't need funds now, give water'; Demand of farmers in Sangola)
शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार असल्यामुळे शहाजी पाटील यांनी प्रथमतः महाविकास आघाडीमध्ये, तर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असल्यामुळे सांगोला तालुक्यातील विविध विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. पाण्याच्या विविध योजनांसाठीही त्यांनी निधीची तरतूद केली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेली सांगोला उपसा सिंचन योजना त्यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागताना दिसत आहे. परंतु सध्या तालुक्यात पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलै महिन्यात थोड्या फार झालेल्या पावसाने सांगोला तालुक्यात २४ हजार ११७ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. सद्यस्थितीत पिके पाण्याअभावी माना टाकू लागली आहेत.
नीरा उजवा कालव्याच्या फाट्यांना पाणी येईल, आपल्या पिकांना जीवदान मिळेल, असे येथील शेतकऱ्यांना वाटत होते. नीरा उजवा कालवा पाणी वाटपामध्ये नियमाप्रमाणे ‘टेल टू हेड’ पाणी वाटप झाले पाहिजे होते. परंतु या कालव्याच्या तालुक्यातील फाटा क्रमांक आठला शेवटी असूनही अद्याप पाणी मिळाले नाही. पाणी मिळाले नसल्याने या परिसरातील शेतकरी सध्या आंदोलनाच्या तयारीत आहेत.
सांगोला तालुक्यातील फाटा क्रमांक पाचवरील शेतकऱ्यांनी आंदोलनानंतर पाणी मिळविण्यात यश मिळविले आहे. आपले प्रसिद्ध आमदार असून निधी मोठ्या प्रमाणात मिळत असतानाही आपल्या हक्काचे पाणी का मिळत नाही? असा सवाल शेतकरी उघडपणे विचारत आहेत.
आमदार, खासदारांचे प्रयत्न मग पाणी का नाही?
नीरा उजवा कालव्याच्या फाट्याला नियमाप्रमाणे पाणी मिळावे, यासाठी आमदार शहाजी पाटील यांनी अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. पाणी दिले जाईल, असे आश्वासनही मिळाले होते. तसेच, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनीही या भागातील शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे मिळावे, यासाठी थेट अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना केल्या होत्या. आमदार, खासदारांनी प्रयत्न करून, अधिकाऱ्यांना सांगूनही नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना पाणी का मिळत नाही? 'पाण्यात राजकारण की राजकारणात पाणी मुरतंय' हेच येथील शेतकऱ्यांना कळेनासे झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.