Balasaheb Thorat Sarkarnama
मुंबई

Balasaheb Thorat : अजितदादांच्या 'निधी' चे प्रकरण घेऊन बाळासाहेब थोरात न्यायालयाच्या दारात ?

Monsoon Session 2023 : उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवारांनी वाटलेल्या निधीवाटपाचा मुद्दा काँग्रेस तापवणार असल्याचे दिसत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवारांनी वाटलेल्या निधीवाटपाचा मुद्दा काँग्रेस तापवणार असल्याचे दिसत आहे. पळवलेले, फोडलेले आमदार सांभाळण्यासाठी आणि ज्यांना मंत्रीपद देऊ शकणार नाही अशांना गोंजारण्यासाठीच निधी खैरात केली आहे, अशा शब्दातं काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरातांनी अजितदांदांवर तोफ डागली आहे. निधीवाटपाचा गोंधळ संपवा आणि अन्याय दूर करा, अन्यथा थेट न्यायालयाच्या दारात जाऊ, असा इशारा देऊन थोरातांनी सरकारला आव्हानही दिले आहे. याचा परिणाम म्हणजे हे प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

विधिमंडळाच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान बोलताना थोरातांनी राज्य सरकारच्या निधीच्या असमान वाटपाची यादीच वाचून दाखवली आहे."शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येऊन एक वर्ष झाले आहे या एक वर्षात आपण चार अधिवेशने केली. मागच्या पावसाळी अधिवेशनात आपण 25 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 52 हजार कोटी रुपयांच्या विक्रमी पुरवणी मागण्या मांडल्या आणि या अधिवेशनामध्ये 41 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सरकारने सादर केल्याचे बाळासाहेब थोरातांनी सांगितले.

थोरात म्हणाले, " एका वर्षभरात फक्त पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून एक लाख वीस हजार कोटी रुपये वाटप केले जातात हे राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले लक्षण नाही. एकूण अर्थसंकल्पाच्या पाच ते दहा टक्के पुरवणी मागण्या असाव्या असा संकेत आहे मात्र हा संकेत या सरकारने पायदळी तुडवला आहे. आम्ही देखील या अगोदर सरकार मध्ये राहिलेलो आहोत आणि विरोधी पक्ष म्हणूनही आम्ही कामकाज केलेले आहे. इतिहासात कधीच झाले नव्हते अशा घटना या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून घडलेल्या आहेत."

निधी वाटपाची यादी दाखवत थोरात म्हणाले, "१०५ आमदार असलेल्या सत्ताधारी भाजपाच्या अनेक आमदारांना देखील अत्यंत तुटपुंजा निधी दिला आहे. हा असमतोल योग्य नाही. मी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची आकडेवारी काढलेली आहे, ज्यांना निधी मिळाला त्यांच्याबद्दल माझ्या मनात आकसाची भावना नाही, म्हणून मी त्यांची नावे सभागृहात जाहीर करीत नाही, मात्र आपण ६५ टक्के निधी सत्तेत सहभागी असलेल्या १०० आमदारांना दिलेला आहे.

मी यासंदर्भात केवळ आकडे सांगणार आहे, ७४२ कोटी, ५८० कोटी, ४८२ कोटी, ४५६ कोटी, ४३६ कोटी, ३९२ कोटी या सगळ्या शेकडो कोटीतल्या रकमा आहेत. ज्यांना आपण मंत्री करु शकत नाही त्यांना आपण भरघोस निधी दिल्याचे दिसून येते. आपण जर समतोल साधणार आहात असे म्हणताय तर मग एका मतदारसंघात शेकडो कोटीची खैरात वाटताय आणि बाजूच्या मतदारसंघात शून्य, हा कोणता न्याय म्हणावा ? मी सभागृहाच्या माहितीसाठी एका जिल्ह्याचे उदाहरण देणार आहे. या जिल्ह्यात एकाच मतदारसंघात ७३५ कोटी आणि बाकी संपूर्ण जिल्ह्यासाठी २१५ कोटी यामुळे राज्याचा समतोल तर बिघडणारच पण आपल्यातलाही असमतोल वाढेल.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेल्या कामांना आपण आकसापोटी स्थगिती दिलेली आहे, आम्ही वारंवार मागणी केली, आपणाकडे पुरवणी मागण्यांसाठी १ लाख २५ हजार कोटी आहेत आणि स्थगिती उठविण्यासाठी २ हजार कोटी शिल्लक नाही, हा कसला न्याय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT