Raju Patil, Raj Thackeray  Sarkarnama
मुंबई

Raju Patil News : मनसे आमदार राजू पाटील लोकसभा निवडणूक लढणार? काय असणार राज ठाकरेंचा निर्णय?

Bhagyashree Pradhan

Thane News : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच कल्याण लोकसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुत्र श्रीकांत शिंदे लढवत असल्याने प्रतिष्ठेची समजली जाते. महायुतीमध्ये असलेले सर्वच मित्रपक्ष त्यांना साथ देणार आहेत, तर महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही, असे असले तरी मनसेचा महाराष्ट्रातील एकमेव आमदार राजू पाटील हे याच लोकसभा मतदारसंघातील एक आमदार आहेत. त्यामुळे मनसे नेमका कोणाला पाठिंबा देणार की स्वतः लढणार, या चर्चेला आता उधाण आले आहे.

खासदार शिंदे आणि आमदार पाटील यांच्यात लुटूपुटूची भांडण...

खासदार शिंदे आणि आमदार पाटील यांच्यात कायमच लुटूपुटूची भांडणे पाहायला मिळतात. तीन महिन्यांपूर्वीच आमदार पाटील यांनी घरच्या लोकांना पॉकेटमनी मिळावा, म्हणून स्वतःच्या खात्यातून काही लोकांना कामे देण्यात आली आहेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना लगावला होता. त्यांनतर खासदारांनीदेखील 'मुंगेरीलाल के हसीन सपने,' असे म्हणत 'आपल्या नावापुढे माजी येणार नाही याची काळजी घ्या,' असे वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केले होते. याआधीदेखील पलावा येथे होत असलेल्या वाहतूककोंडीवरून एकमेकांना टोले लगावले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनसे आमदार राजू पाटील अधिवेशनातही या गटाशी करीत होते चर्चा

मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) अधिवेशनातही ठाकरे गटाच्या नेत्यांशी चर्चा करताना पाहायला मिळाले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळातदेखील मनसे ठाकरेंना पाठिंबा देणार का, अशा चर्चा रंगल्या होत्या...

आमदारांच्या मुलाच्या साखरपुड्याला खासदार शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित...

काही दिवसांपूर्वी आमदार राजू पाटील यांच्या मुलाचा साखरपुडा झाला. यावेळीदेखील खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित होते. त्यानंतर राजू पाटील यांचा खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी कामावरून असलेला वाद तूर्तास मिटला असल्याचे बोलले गेले होते.

नेमकी मनसेची भूमिका काय असणार?

पुणे येथे झालेल्या मनसे मेळाव्यात राजू पाटील यांनी जर राज ठाकरे यांनी लढायला सांगितले तर लोकसभादेखील लढेन, असे सांगितले. मात्र, आता मनसे स्वतः लढणार की कोणाला पाठिंबा देणार, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपनेते तसेच मुख्यमंत्री शिंदेदेखील राज ठाकरे यांची सातत्याने त्यांच्या घरी भेट घेताना दिसून येत आहेत. यामुळे राज ठाकरे लोकसभेसाठी काय निर्णय घेणार, याची उत्सुकता मनसैनिकांमध्येही शिगेला पोहोचली आहे.

Edited By : Rashmi Mane

R...

SCROLL FOR NEXT