Praniti Shinde, Yashomati Thakur,Manda Mhatre
Praniti Shinde, Yashomati Thakur,Manda Mhatre Sarkarnama
मुंबई

Maharashtra Budget Session: टोमणे अन् आरोप-प्रत्यारोप करीत महिला आमदारांनी गाजविले सभागृह

सरकारनामा ब्युरोे

Maharashtra politics: आधुनिक महिला धोरणावरच्या चर्चेत भरूभरून, मोकळेपणाने आणि हवा तेवढा वेळ बोलण्याची संधी आज महिला आमदारांना देण्यात आली. त्या संधीचे सोने करत 'साऱ्याजणीं'नी अर्थात, महिला आमदारांनी विधानसभेचे सभागृह गाजविले. राजकीय आरोप-प्रत्यारोप, टोले-टोमण्यांपासून लांब राहणाऱ्या महिला आमदारांनी जोरदार फटकेबाजी केली. महिला धोरणांबाबत मांडलेल्या अपेक्षा, भूमिकांना सभागहातील सर्व आमदारांनीही दाद दिली.

सभागृहाचे कामकाज सुरू होताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी महिला आमदारांच्या लक्षवेधी प्रश्नांना प्राधान्य दिले. त्यानंतर याआधीच्या १९९४, २००२, २०१४ आणि २०१९ च्या धोरणांच्या अनुषंगाने नवे धोरण तयार करण्यासाठी नार्वेकर यांनी मांडलेल्या प्रस्तावावर महिला आमदारांनी सहभाग घेतला.

'महिला दिन' एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता वर्षभर महिलांचा मान राखला पाहिजे, अशी अपेक्षा महिला आमदारांनी व्यक्त केली. आरोग्य, शिक्षण, राजकारण, अत्याचार, महिला धोरणांसह सरकारी, निमसरकारी सेवेतील महिलांचे वेतन, त्यांच्यासाठी सुविधा, सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष, प्रवासाच्या सुविधांकडे महिला आमदारांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

राजकीय भूमिका मांडताना महिला आमदारांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षाही लपवून ठेवल्या नाहीत. आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) म्हणाल्या, "राज्याच्या मंत्रीमंडळात महिलांना केवळ महिला व बालविकास खाते दिले जाते. त्यापलीकडे जाऊन नगरविकास, अर्थ खात्यांसारखी महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारीही महिलांकडे आली पाहिजे. तेव्हाच खऱ्याअर्थाने महिला दिन साजरा होईल." प्रणिती शिंदे यांच्या मताला बाके वाजवून सर्व महिला आमदारांनी प्रोत्साहन दिले.

सभागृहातील दीर्घ काळाच्या कामकाजाचा अनुभव मांडताना माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी जोरदार फटकेबाजी केली. ठाकूर म्हणाल्या, "या सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिलेला संधी नाही. जुन्या सरकारमध्ये आम्हा महिलांनी मंत्रीपद मिळाले होते. पण आता ते का नाही? याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या सभागृहात माधुरी मिसाळ आपण वरिष्ठ आहात. त्यामुळे तुमच्याकडे महिला व बालविकास-खाते देऊन सन्मान केला पाहिजे." त्यावर स्मितहास्य करीत मिसाळ (Madhuri Misal) यांनी ठाकूर यांच्या भूमिकेला दाद दिली.

आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांच्या आश्वासक भाषणाने सभागृहात उत्साह दिसून आला. म्हात्रे म्हणाल्या, "मी माझ्या विधानसभा मतदारसंघात एका पुरुष उमेदवाराचा पराभव करून निवडून आले आहे. त्यामुळे मी स्वतःला पुरुष मानते. आम्ही कोणाच्या तुलनेत कमी पडत नाही. काही गोष्टी मागून मिळत नाहीत. त्या हिसकावून घ्या लागतात."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT