Pune Crime News  Sarkarnama
मुंबई

Crime News : जिल्हा परिषदेचे बनावट शिक्के, अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह 4 जणांना अटक; रिक्षाचालकाची 15 लाखांची फसवणूक

Ramchandra Mane Arrest : अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रामचंद्र माने, रामदास टेकाळे, लक्ष्मण मिसाळ आणि मोहनलाल चौधरी यांचा समावेश आहे.

शर्मिला वाळुंज

KDMC News : डोंबिवली पूर्वेकडील सागाव परिसरातील एका बेकायदा इमारतीतील सदनिका विक्री व्यवहारात बनावट कागदपत्रांचा वापर करून रिक्षाचालकाची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे अध्यक्ष आणि अन्य दोन जणांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रामचंद्र माने, रामदास टेकाळे, लक्ष्मण मिसाळ आणि मोहनलाल चौधरी यांचा समावेश आहे. या चौघांविरुद्ध फसवणूक तसेच बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बळीराम पांडुरंग जाधव हे व्यवसायाने रिक्षाचालक असून त्यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, वर्ष २०१४ मध्ये सांगाव-नांदिवली येथील नंदा निवास चाळीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव रहिवाशांसमोर ठेवण्यात आला होता. त्या वेळी संबंधित बांधकामाला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची अधिकृत परवानगी असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच प्रत्येक रहिवाशाला ३५० चौरस फुटांचे घर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र काही काळानंतर ३०० चौरस फुटांचे घर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अतिरिक्त क्षेत्रफळ हवे असल्यास स्वतंत्र रक्कम भरावी लागेल, अशी अट घालण्यात आली. त्यानुसार वाढीव २६५ चौरस फुटांच्या बांधकामासाठी बळीराम जाधव यांनी कर्ज काढून संबंधित विकासकांना १५ लाख रुपये दिले.यानंतर यशवंत पार्क ही इमारत अनधिकृत असल्याची माहिती जाधव यांना मिळाली. त्यांनी बांधकाम परवानगीची पडताळणी केली असता धक्कादायक बाब समोर आली. आरोपींनी दाखविलेली ऑगस्ट २००८ मधील जिल्हा परिषदेची बांधकाम परवानगी बनावट असल्याचे उघड झाले.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील बांधकामासाठी जिल्हा परिषदेची बनावट परवानगी, खोटे शिक्के आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करण्यात आला होता. या कागदपत्रांच्या आधारे इमारत अधिकृत असल्याचा भास निर्माण करून फिर्यादीची तसेच शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच फरार पण...

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी माने याच्याकडे शिंदे गटाच्या कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुखपदाची जबाबदारी होती, तर आरोपी लक्ष्मण मिसाळ हा बांधकाम कामगार क्षेत्रातील महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचा अध्यक्ष आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघेही फरार झाले होते. मात्र मानपाडा पोलिसांनी सखोल शोधमोहीम राबवून त्यांना अटक केली. या आरोपींनी यापूर्वीही अशाच पद्धतीने इतर नागरिकांची फसवणूक केली आहे का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT