chagan Bhujbal, Manoj jarange patil  Sarkarnama
नगर

Maratha Reservation: मराठा क्रांती मोर्चा आक्रमक अन् मंत्री भुजबळांच्या प्रतिमेबरोबर केली अशी कृती...

Pradeep Pendhare

Maratha Reservation : ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात केलेल्या आक्रमक भाषणाचे पडसाद उमटू लागले आहेत. मंत्री भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेविरोधात सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. जामखेड येथे सकल मराठा समाजाच्यावतीने मंत्री भुजबळ यांच्या विधानांचा निषेध करून त्यांच्या प्रतिमेला जोडो मारण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या या आंदोलनावर ओबीसी संघटनांकडून प्रतिक्रिया देण्याची तयारी सुरू झाली आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा झाली. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भाषण केले. मंत्री भुजबळ यांच्या निशाणावर जरांगे पाटील होते. जरांगे पाटील मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजाला टार्गेट करत असल्याचा अप्रत्यक्षपणे मंत्री भुजबळ यांनी आरोप केला. मंत्री भुजबळ यांनी आपल्या भाषणात जरांगे पाटील यांच्यावर प्रहार केले. या भाषणाचा आता तीव्र पडसाद उमटले आहेत. नाहुली (ता. जामखेड) येथील मराठा क्रांती मोर्चाचे आरक्षणासाठी सुरू केलेले साखळी उपोषण सुरूच आहे. त्यांचा आंदोलनाचा रविवारी 26 वा दिवस आहे. आंदोलनकर्त्यांनी सुरूवातीला मंत्री भुजबळ यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून जोडे मारले. त्यासोबतच मंत्री भुजबळ यांची प्रतिमा पायदळी तुडवली.

दरम्यान, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या भाषणातील वक्तव्यांची दखल घेतली आहे. छत्रपती संभाजीराजे हे देखील मंत्री भुजबळ यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. भुजबळ हे सरकारमध्ये आहेत. त्यांनी अशी प्रकारचे वक्तव्य करणे शोभत नाही. त्यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करा, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.

मराठा क्रांती मोर्चा जामखेडमधील आंदोलनकर्त्यांनी देखील संभाजीराजे यांनी केलेल्या मागणीची सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे. जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत लक्षात ठेवण्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जाहीर कार्यक्रमात मराठा आरक्षणासाठी कटीबद्ध असल्याची शपथ मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची आठवण या आंदोलनकर्त्यांनी करून दिली.

पुढचे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

मराठा आरक्षणावर कार्यवाही न झाल्यास पुढचे आंदोलन जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र करू, असा इशारा सरपंच सचिन घुमरे, नाहुली येथील विजय मोरे, नितीन घुमरे, भीमराव बहीर, देवराव जाधव, सुरेश बहीर, राजेश बहीर, माऊली बहीर, आण्णासाहेब बहीर, विश्वजित घुमरे यांनी दिला.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT