Kiran Kale
Kiran Kale Sarkarnama
नागपूर

Kiran Kale News: आत्मदहनाचा इशारा देणारे काँग्रेस शहराध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात; अहमदनगर रस्ते गैरव्यवहार..

सरकारनामा ब्यूरो

Kiran Kale In police custody : अहमदनगर महानगरपालिकेतील रस्ते घोटाळा प्रकरणी आत्मदहनाचा इशारा देणारे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे.

काळे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची पूर्वतयारीची बैठक काल (बुधवारी) रात्री उशिरा सुरू असतानाच तोफखाना पोलिसांनी काळे यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली.

महानगरपालिकेतील दोनशे कोटींच्या रस्ते गैरव्यवहारातील बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. तरीही कारवाई न झाल्यानं जिल्हाधिकारी यांच्या दालना समोर आत्मदहन करणार असल्याचे किरण काळे यांनी जाहीर केले होते.

काळे यांना आत्मदहन आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र काळे यांनी माघार घेण्यास नकार दिला. अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात आणले. काल दुपारी महापालिका उपायुक्तांच्या दालनात झालेली चर्चेची फेरी निष्फळ ठरली होती.

त्यानंतर सायंकाळी पुन्हा पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी मध्यस्थी करत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तोही प्रयत्न निष्फळ ठरला. रात्री काळेंना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी मनपा उपायुक्त तथा या प्रकरणाचे चौकशी अधिकारी कुऱ्हे, शहर अभियंता मनोज पारखे, अभियंता निंबाळकर यांना पाचारण करत पोलीस स्टेशनमध्ये काळे व मनपा अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा चर्चा घडवून आणली.

शहरातील रस्त्यांची कामे निकृष्ट झाली आहेत.रस्ते चार महिन्यात गायब होत आहेत. काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण केले जात आहे, असे म्हणत काळे यांनी अधिकाऱ्यांना यावेळीही चांगलेच धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी चौंडीला गेलेल्या आयुक्त पंकज जावळे यांना उपायुक्त कुऱ्हे यांनी काळे यांचे म्हणणे कळवले. त्यानंतर आयुक्तांच्या मान्यतेने ठोस लेखी आश्वासन देत बनावट टेस्ट रिपोर्ट प्रकरणी दोषींवर दीड महिन्यांच्या आत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

तांत्रिक बाबींबाबत बनावट कागदपत्रांच्या कामांचे सक्षम तांत्रिक प्राधिकरणाकडून चौकशी करून चौकशी अंति निकृष्ट कामे करणाऱ्या दोषींवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन काळे यांना देण्यात आले. त्यानंतर काळे यांनी आत्मदहन आंदोलन स्थगित करत असल्याची काँग्रेसच्या वतीने घोषणा केली. मात्र लेखी आश्वासनाची पूर्तता न केली गेल्यास पुन्हा आत्मदहन केले जाईल असा इशारा देखील त्यांनी मनपा प्रशासनाला दिला.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT