Nagpur Corporation Election Sarkarnama
नागपूर

Nagpur Election: असाही उलटा राजकीय प्रवास! राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला व्हायचंय पुन्हा नगरसेवक

Nagpur Election: प्रत्येक नगरसेवकाला आमदार व्हायचे असते. मात्र नागपूरमध्ये एका आमदाराचा उलट राजकीय प्रवास सुरू केला आहे.

Rajesh Charpe

Nagpur Election: प्रत्येक नगरसेवकाला आमदार व्हायचे असते. मात्र नागपूरमध्ये एका आमदाराचा उलट राजकीय प्रवास सुरू केला आहे. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांनी आपल्या परंपरागत पांढराबोडी परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक १३ मधून लढण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रकाश गजभिये यापूर्वी नगरसेवक होते. केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचे कट्टर समर्थक होते. मात्र आठवले भाजपात गेल्यानंतर गजभिये यांनी त्यांची साथ सोडली. ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत कायम राहिले. भंडारा जिल्ह्यात एका अनुसूचित जातीच्या एका महिलेवर अत्याचार झाल्यानंतर तत्कालीन राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य व लाँग मार्चचे प्रणेते जोगेंद्र कवाडे यांनी राजीनामा दिला होता.

मागासवर्गीयांमध्ये निर्माण झालेला असंतोष आणि आठवले व कवाडे यांची पोकळी भरून काढण्यासाठी शरद पवारांनी विदर्भातून अनुसूचित जातीच्या उमेदवाराला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीच्या शोधात प्रकाश गजभिये यांचे नाव समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेत पाठवले होते. सहा वर्ष ते आमदार राहिले. सध्याच्या राजकीय घडामोडी बघता प्रकाश गजभिये यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाही. हे बघून विधान परिषदेचा कार्यकाळ संपला तेव्हापासून त्यांनी पुन्हा महापालिकेची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांनी निवडणूक लढणार असल्याचे आता जाहीर केले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास दोन दिवसांचा वेळ अद्याप शिल्लक आहे.

आता प्रकाश गजभिये महापालिकेची निवडणूक लढतात की माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार असताना प्रकाश गजभिये यांनी आपला कार्यकाळ चांगलाच गाजवला होता. विशेषतः अधिवेशनाच्या काळात ते वेगवेगळ्या वेषभूषा करून विधान भवन यायचे आणि ज्वलंत विषयावर सरकारचे लक्ष वेधून घ्यायचे. रिपाइंत असताना एक सदस्यांच्या प्रभागातून ते निवडून यायचे. तीन सदस्यांचा प्रभाग झाल्यानंतरही ते निवडून आले होते.

२००२च्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी आपल्यासोबत पत्नीलाही उभे केले होते. मात्र या निवडणुकीत पत्नीला ते निवडून आणू शकले नाहीत. आता चार सदस्यांचा प्रभाग झाला आहे. राजकीय परिस्थिती बदलली आहे. प्रत्येक प्रभाग सुमारे ४० हजार मतदारांचा झाला आहे. हे बघता प्रकाश गजभिये यांना महापालिकेच्या सक्रिय राजकारणात उतरताना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT