Nagpur University 
नागपूर

Nagpur Lamination Scam: नागपूर विद्यापीठात ‘पदवी लॅमिनेशन’ घोटाळा! विद्यार्थ्यांकडून 'असे' उकळले लाखो रुपये

Nagpur Degree Lamination Scam: लॅमिनेशन शुल्काच्या नावाखाली मागील तीन वर्षांत विद्यापाठाने आता पर्यंत लाखो रुपये विद्यार्थ्यांकडून उकळले आहेत.

Rajesh Charpe

Nagpur Degree Lamination Scam: कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील लॅमिनेशन घोटाळा आता समोर आला आहे. लॅमिनेशन शुल्काच्या नावाखाली मागील तीन वर्षांत विद्यापाठाने आत्तापर्यंत लाखो रुपये विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात आले आहेत.

नागपूर विद्यापीठाने ‘सिक्युरिटी फीचर’सह पदवी देण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी घेतला. त्यानंतरही लॅमिनेशनसाठी वसुली करण्यात आली आणि त्याची देयके सुद्धा काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आला आहे. विद्यापीठात दरवर्षी किमान ६० ते ७० हजार पदवी प्रमाणपत्रे तयार केले जातात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर एका वर्षाने विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे महाविद्यालयात पाठविण्यात येतात. २०२१ पूर्वी पदवी लॅमिनेशन करून देण्यात येत होती. त्यासाठी १६ रुपये प्रत्येकी घेण्यात यायचे. मात्र, विद्यापीठाच्या बनावट पदवी तयार करणे, त्यातून नोकऱ्या मिळविण्याचे प्रकार उघडकीस आले. त्यामुळे पदवीची गुणवत्ता आणि त्याच्या सुरक्षिततेसाठी त्यात ‘सिक्युरिटी फीचर्स’ टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

परीक्षा मंडळाकडून पदवीवर लॅमिनेशन केल्यास त्यातील ‘सिक्युरिटी फीचर्स’चा फायदा होणार नाही, असा तर्क देत पदवीला लॅमिनेशन करणे बंद करावे असा प्रस्ताव देण्यात आला. तो मान्य करीत, पदवी ‘लॅमिनेशन’ बंद करण्यात आले. तेव्हापासून पदवीचे लॅमिशन बंद आहे असे असताना, विद्यार्थ्यांकडून १६ रुपये दराने पैसे घेण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, व्यवस्थापन परिषदेच्या एका बैठकीत, विष्णू चांगदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

याशिवाय या शुल्काबाबत फेरविचार करण्याची मागणी केली होती. त्यामुळे या विषयावर परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर हा विषय खरेदी समितीकडे पाठविण्यात आला. खरेदी समितीकडून या विषयावर नवीन दर संबंधित विभागाकडून मागविण्याची शिफारस करण्यात आली. मात्र, खरेदी समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने हा विषय जसाचा तसाच राहिला. मात्र, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून सन २०२२, २०२३ आणि २०२४ या वर्षात विद्यार्थ्यांकडून १६ रुपयांप्रमाणे पदवी आणि ‘लॅमिनेशन’चा खर्चापोटी लाखो रुपयांच्या शुल्काची वसूली करण्यात आलेली आहे. त्यामुळे ‘लॅमिनेशन’च्या नावाखाली वसूल केल्या जाणारा पैसा नेमका कुणाच्या खिशात जातो? हा प्रश्‍न आहे.

अधिसभेमध्ये सदस्याकडून विचारणा

विद्यापीठाच्या मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पीय अधिसभेमध्ये अर्थसंकल्पात परीक्षा विभागाच्या खर्चाबाबत चर्चा करताना, सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी यांनी पदवीचे लॅमिनेशनवर नेमका किती खर्च होतो याबाबत विचारणा केली होती. त्यावर प्रशासनाकडून ते बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर उपप्रश्‍नात ॲड. वाजपेयी यांनी तो खर्च का वसूल केला जातो अशी विचारणा केली होती. मात्र, प्रशासनाकडून थातूरमातूर उत्तरं देत, वेळ मारून नेण्यात आलेली होती.

वसुलीला मंजुरी देण्यासाठी देयके सादर

परीक्षा विभागातून याही वर्षी पदवी आणि त्याच्या लॅमिनेशनपोटी वसूल करण्यात आलेल्या पैशाबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यासाठी जवळपास ९ लाख १६ हजार रुपये मंजूर करण्यासाठी वित्त विभागाकडे पाठविण्यात आले आहे. हा प्रस्ताव मंजूर करण्याचा दबाव वित्त व लेखा अधिकाऱ्यावर असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांकडून पदवी आणि लॅमिनेशनचे पैसे घेण्यात येतात. आता याबाबत नव्या दरासाठी मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्याप यावर्षीचे बील मंजूर करण्यात आलेले नाही, असे विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT