Shantigiri Maharaj, Eknath Shinde sarkarnama
नाशिक

Nashik constituency 2024: मुख्यमंत्री शिंदे यांनी का घेतला शांतिगिरी महाराजांचा धसका?

Sampat Devgire

Shantigiri Maharaj News : नाशिक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारामध्ये थेट मुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष घातले आहे. बुधवारी झालेल्या दौऱ्यात शिंदे यांनी प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी ऐवजी अपक्ष शांतिगिरी महाराज यांचा वारंवार उल्लेख केला.

नाशिक मतदारसंघात शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. प्रारंभी त्यांनी शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी करणार, असे जाहीर करत उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. पक्षाने उमेदवारी न दिल्याने आता ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. त्यांच्या अनुयायांकडून जोरदार प्रचार सुरू आहे.

या प्रचारात माहिती तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचाही अतिशय व्यावसायिक वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच प्रतिस्पर्धी शांतिगिरी यांच्या प्रचाराची चर्चा करताना दिसतात. मुख्यमंत्री शिंदे यांनी शांतिगिरी यांच्याशी दोन वेळा संपर्क साधला शांतिगिरी यांनी अध्यात्मिक क्षेत्रातच चांगले काम करावे. राजकीय क्षेत्रात पडू नये, असा सल्ला देखील त्यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे आणि विविध नेते शांतिगिरी यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून प्रयत्नशील होते. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. शांतिगिरी उमेदवारीवर ठाम राहिले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी विद्यमान खासदार गोडसे यांसह जवळजवळ सर्वच उमेदवारांनी शांतिगिरी यांचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे नेमके कोणाचे गणित बिघडणार हे अद्याप स्पष्ट नाही.

मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिकच्या दौऱ्यात काही साधूंची देखील बैठक घेऊन चर्चा केली. मात्र या साधूंची नावे विचारात घेतल्यास यातील अनेकांना साधू म्हणून समाजाने मान्यता दिली आहे का, असा गंभीर प्रश्न पडतो. शांतिगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळेच या साधूंची चर्चा करण्याची वेळ मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आली. त्यामुळे शांतिगिरी महाराज प्रामुख्याने नरेंद्र मोदी यांचे अनुयायी आणि हिंदुत्ववादी मते आपल्याकडे खेचतील अशी भीती त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना आहे. या भीतीमुळेच उमेदवार आणि पक्षांचे नेते काळजीत पडले आहेत.

शांतिगिरी महाराज यांचा नाशिक मतदारसंघात १,८८,०७५ भक्त परिवार आहे. याशिवाय राज्याच्या विविध भागातून त्यांचे भक्त प्रचार करण्यासाठी आले आहे. शांतिगिरी महाराज यांनी सुरुवातीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि राजकारणात अपप्रवृत्ती दूर करून शुद्धीकरण करण्यासाठी उमेदवारी करीत असल्याचे सांगितले आहे.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना शांतिगिरी महाराज हिंदुत्ववादी मतांमध्ये विभागणी करतील, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांना शांतिगिरी महाराज ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाची मते आपल्याकडे खेचतील, अशी भीती वाटते. या सगळ्यांचीच ही भीती अनाठाई आहे, असे म्हणता येणार नाही. शांतिगिरी महाराज यांना अधिक मते मिळाल्यास दोन्ही उमेदवारांच्या मतांचे गणित बिघडू शकते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही शांतिगिरी महाराजांचा चांगलाच धसका का घेतला आहे.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT