Manoj Jarange Sarkarnama
नाशिक

Manoj Jarange Mumbai Morcha : मराठा आंदोलनकर्त्यांचा पोलिसांना येईना अंदाज?; संख्येचा दावा खोडला

Marathi News : नाशिकच्या सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी पोलिसांचा दावा फेटाळला.

Arvind Jadhav

Nashik News : मनोज जरांगे-पाटील यांच्या पदयात्रेला नाशिकमधून अवघे 500 ते 600 मराठा समाजाचे प्रतिनिधी पोहोचतील, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. उत्तर महाराष्ट्रातून अवघे साडेतीन हजार समाजबांधव निघून पुणे येथे जरांगे-पाटील यांच्या पदयात्रेत सहभागी होतील, असे पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांना मराठा समाजात सुरू असलेल्या घडामोडींचा अंदाज बांधता येईना, की खरोखर ही वास्तव स्थिती आहे, अशी चर्चा यामुळे सुरू झाली. दरम्यान, नाशिकच्या सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी पोलिसांचा हा दावा फेटाळून लावत मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव आंदोलनात सहभागी होतील, असे सांगितले.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा सुरू झाली. अंतरवली सराटी येथून जरांगे-पाटील समाजबांधवांसह पायी नगर, पुणे, नवी मुंबई आणि मुंबई असा प्रवास करतील. नाशिक जिल्ह्यातील मराठाबांधव पिंपरी चिंचवड येथे पदयात्रेत सहभागी होतील, तर उर्वरित समाजबांधव थेट मुंबईला पोहोचतील. याबाबत पोलिसांच्या राज्य गुप्त वार्ता विभागाने संकलित केलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील अवघे 500 ते 600 मराठा समाजाचे कार्यकर्ते पिंपरी चिंचवड येथे पोहोचतील. यात 80 ते 90 चारचाकी, 3 ते 4 अन्नधान्याचे ट्रक, 10 ते 12 ट्रॅक्टर आणि 50 ते 60 मोटारसायकलींचा समावेश असेल, तर 24 तारखेला यापेक्षाही कमी संख्या असेल, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.

मराठा समाजाची सर्वाधिक ताकद असलेल्या नाशिक ग्रामीणमधून फक्त 70 ते 80 जण पुण्याकडे रवाना होतील, तर 24 ते 26 तारखेदरम्यान जमा झालेला शिधा अन् 25 कार, काही पिक-अप व ट्रक मुंबईकडे रवाना होतील. उत्तर महाराष्ट्रातून पुणे येथे फार तर तीन ते साडेतीन हजार मराठा समाजाचे कार्यकर्ते पोहोचतील, तर 24 तारखेपासून 26 तारखेपर्यंत ही संख्या थोडी वाढू शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे.

मराठा समाजाकडून करण्यात येणारा दावा आणि प्रत्यक्षात पोलिसांचा अंदाज यात मोठी तफावत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत बोलताना सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी नाना बच्छाव यांनी सांगितले की, पोलिसांनी अहवालात काय नमूद केले, यावर काही अवलंबून नाही. आमची तयारी पूर्ण आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अहवालावर विचार करण्याची आवश्यकता नाही

नांदगाव, येवला, कळवण यांसह सगळ्याच गावांमधून फेऱ्या काढण्यात येत आहेत. शिधा संकलित होत आहे. कळवणमधील ४८ गावांतून प्रत्येकी एक पिक-अप आणि एक ट्रॅक्टर देण्यात आला आहे. एका तालुक्यातून फक्त एक हजार बांधव पुढे आले, तर हा आकडा १५ हजार होतो. वास्तविक पदयात्रा आणि मुंबईत नाशिक जिल्ह्यातूनच मोठ्या संख्येने समाजबांधव येणार आहेत. त्यामुळे या अहवालावर विचार करण्याची आवश्यकता नसल्याचे बच्छाव यांनी स्पष्ट केले.

राजकीय नेत्यांचा सक्रिय सहभाग नाही

नाशिक जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार आहेत. विरोधक लोकप्रतिनिधी नसल्याने पोलिसांनी हा अंदाज बांधला असावा. वास्तविक समाजापासून लोकप्रतिनिधी दोन हात लांब आहेत. त्याचा हिशोब आगामी निवडणुकांमध्ये समाज घेईल, अशी भूमिका शिवाजी सहाणे यांनी मांडली. समाजाच्या योग्य मागणीसाठी काही कार्यकर्ते घरातून पैसे घालून काम करीत आहेत. त्याची जाणीव समाजबांधवांना असल्याचे सहाणे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपाचा गड असलेल्या उत्तर महाराष्ट्रातून किती समाजबांधव पुढे येतात, याकडे सर्वांचे लागले आहे.

(Edited by Sachin Waghmare)

R...

SCROLL FOR NEXT