Eknath Shinde, Narendra Modi Sarkarnama
नाशिक

Nashik Youth Festival : युवकांसाठी खुद्द पंतप्रधान येणार नाशिकमध्ये

सरकारनामा ब्यूरो

अरविंद जाधव :

Nashik News : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आणि याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) करणार आहेत. 12 ते 16 जानेवारी या कालावधीत 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव (Youth Festival) होणार आहे. यामध्ये देशभरातील युवकांचे विविध संघ सहभागी होणार आहेत.

हा राष्ट्रीय युवा महोत्सव असून दस्तूरखुद्द पंतप्रधान उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाचे 'ग्रँड' आयोजन केले जात आहे, म्हणूनच याच्या तयारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जातीने लक्ष घालत आहेत. आज यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली.

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्यामुळे आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका आणि हा महोत्सव यशस्वी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन असून तो युवादिन म्हणून साजरा केला जातो.

एका छताखाली हजारो युवक

नाशिकमधील राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधून प्रत्येकी 100 युवांचा चमू, राष्ट्रीय सेवा योजना युवा स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटन युवा स्वयंसेवक असे सुमारे आठ हजार जण सहभागी होणार आहेत. तपोवन मैदानावर उद्घाटन झाल्यानंतर महोत्सवांतर्गत सांस्कृतिक, कौशल्य विकास, युवा कृती असे स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहेत. यासाठी उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त युवकांना एकत्रित आणण्यासाठी भाजपसह मित्रपक्षांचे प्रयत्न आहेत.

भव्य आयोजन

महोत्सवाच्या आयोजनासाठी विविध समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. गृह, वित्त, महसूल, कृषी, उच्च व तंत्रशिक्षण, सांस्कृतिक कार्य, पर्यटन, शालेय शिक्षण या विविध विभागांचा यात सहभाग असणार आहे. आजच्या बैठकीला पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT