- शर्मिला वाळुंज
Dombivli News : वाढत्या लोकल रेल्वे गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच डोंबिवली–ठाणे दरम्यान थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या सेवेचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी आम्ही एकत्र आल्याने बऱ्याच लोकांना गुदगुल्या होणार आहेत, असा राजकीय टोला चव्हाण यांनी मारल्याने एकच हशा पिकला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) परिवहन विभागामार्फत प्रायोगिक तत्त्वावर स्वामीनारायण सिटी ते माजिवडा ठाणे अशी बससेवा बुधवार ४ मार्चपासून सुरू झाली. भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव सर्कल ते ठाणे माजिवडा जंक्शन दरम्यान धावणाऱ्या या बसला डोंबिवलीचे आमदार व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी भाषणात रविंद्र चव्हाण यांनी राजकीय वातावरण ढवळून काढणारा टोला लगावला. “आम्ही सर्व एकत्र आल्याने बर्याच लोकांना गुदगुल्या होणार आहेत,” असे वक्तव्य करत त्यांनी सूचक संदेश दिला. त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला; मात्र हा टोला नेमका कोणाला उद्देशून होता, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दरम्यान, डोंबिवली–ठाणे थेट बससेवा सुरू झाल्याने लोकलवरील वाढता ताण काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रायोगिक कालावधीत प्रवाशांचा प्रतिसाद आणि प्रवासी संख्या लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली. प्रत्यक्षात पाहता डोंबिवली स्टेशन वरून मोठागाव येथे येण्यासाठी प्रवाशांना रिक्षासाठी 20 रुपये मोजावे लागतील.
मोठागाव ते माजिवडा 20 रुपये बस अशा पद्धतीने ते ठाणे जातील. मात्र रस्त्यात लागणारे फाटक आणि इतर गोष्टी पाहता स्वामीनारायण सिटी, मोठागाव साठी ही खास सुविधा करण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती. राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली ही बससेवा आगामी स्थानिक राजकारणातही चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुकी दरम्यान शिवसेना शिंदे गटातून शिवसेना ठाकरे गटात गेलेले आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटातून भाजपात गेलेले दीपेश म्हात्रे यांना अजूनही शिवसेनेचा विसर पडलेला नाही. दीपेश यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या सुरवातीला दीपेश यांचे कार्यकर्ते शिवसेनेचे गाणे वाजवत होते. भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी आता ते भाजपात आलेत ही आठवण करून देताच नंतर भाजपाचे गाणे वाजवण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.