उत्तम कुटे
Maval Market Committee Election: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्या आघाडीच्या सहकार पॅनेलने प्रतिस्पर्धी भाजपचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनेलचा धुव्वा उडवत १८ पैकी १७ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आज(दि.२४) भेगडेंच्या परिवर्तन पॅनेलनं उमेदवार न देण्याचा सूज्ञपणा दाखवला. यामुळे १२ वर्षानंतर झालेली मावळ बाजार समितीच्या सभापती,उपसभापतींची निवडणूक बिनविरोध झाली.
मावळ(Maval) बाजार समितीच्या सभापतीपदी आघाडीचे (राष्ट्रवादी) संभाजी शिंदे आणि उपसभापतीपदी नामदेव शेलार यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. याबाबतची घोषणा निवडणूक निर्णय़ अधिकारी शिवाजी घुले यांनी केली. महाविकास आघाडीतील कॉंग्रेसच्या एका गटाला बरोबर घेत मावळ तालुका (जि.पुणे) कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढण्याची भाजपची योजना गेल्या महिन्याच्या २८ तारखेला पूर्ण फसली होती. त्यातून धडा घेत त्यांनी मावळ बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा सुज्ञपणा दाखवला.
एक रुपयाची उलाढाल नसूनही मावळ बाजार समितीच्या सभापती,उपसभापती निवडीसाठी मोठी रस्सीखेच झाली. कालपर्यंत उमेदवारांच्या नावांवर एकमत झाले नव्हते. त्यामुळे बिनविरोध निवड होताच सर्वच संचालकांना संधी देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यातून प्रत्येक सभापती,उपसभापतीला एक वर्षही नाही,तर जेमतेम आठ महिनेच मिळणार आहे. त्यामुळे सभापती,उपसभापतीचा फिरता रंगमंच मावळात होणार आहे.
अल्प कालावधी मिळणार असल्याने तेवढा वेळ प्रपंच बाजूला ठेवून काम करू,असे नवनिर्वाचित सभापती शिंदेनी निवडीनंतर सांगितले. दिलेल्या संधीचे सोने करू असे ते म्हणाले.समितीच्या सहा एकर जागेत मार्केट यार्ड सुरु करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊ काम करू असा दावाही त्यांनी केला आहे. तर, पक्षाचे तालुकाध्यक्ष सांगतील त्याच्या आदल्या दिवशी पदाचा राजीनामा देऊ अशी प्रतिक्रिया उपसभापती शेलार यांनी दिली.
मावळ बाजार समितीच्या सभापती,उपसभापतींची निवडणूक(Election) बिनविरोधच होईल अशी दाट शक्यता `सरकारनामा`ने दोन दिवसांपूर्वीच (दि.२२) वर्तवली होती. ती तंतोतंत खरी ठरली. जागा असूनही गेल्या कित्येक वर्षात मार्केट यार्ड सुरू न होणे यासह इतर अनेक आव्हानांचा सामना मावळच्या नव्या बाजार समितीच्या संचालक मंडळ आणि सभापती,उपसभापतींना करावा लागणार आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.