Rahul Kalate
Rahul Kalate Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Chinchwad By Election : कलाटेंनी ठाकरेंसह पवारांचीही विनंती धुडकावली; शिवसेना आता काय कारवाई करणार ?

उत्तम कुटे- सरकारनामा ब्युरो

Pune News : चिंचवड विधानसेभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बंडखोर राहुल कलाटे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackerey) यांचीही विनंती धुडकावून माघार घेतली नाही. या पोटनिवडणुकीतील आघाडीच्या (राष्ट्रवादी) उमेदवाराचे गणित बिघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे पक्षादेश न पाळल्याने कलाटेंसह त्यांना साथ देणाऱ्या चार नगरसेवकांवर शिवसेनेकडून (ठाकरे) कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (By Poll Election) २६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. कसबापेठ, पुणे या मतदारसंघातील काँग्रेसमधील बंड थंड करण्यात त्यांच्या पक्षाला यश आले. तेथे आता आघाडी विरुद्ध युती (काँग्रेस विरुद्ध भाजप) अशी थेट लढत होईल. चिंचवडमध्ये मात्र कलाटेंचे बंड थोपविण्यात ठाकरे शिवसेनेला अपयश आले.

दरम्यान, राष्ट्रवादीकडूनही (NCP) त्यांची मनधरणी करण्यात आली. मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होऊ घातली आहे. परिणामी कसब्यात काँग्रेसचे टेन्शन गेले असताना दुसरीकडे चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे वाढले आहे.

पक्षादेश धुडकावण्याची राहुल कलाटे (Rahul Kalate) यांची ही तिसरी वेळ आहे. गतवेळी विधानसभेला २०१९ ला त्यांनी चिंचवडमध्येच बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढली होती. त्यावेळी भाजपचे लक्ष्मण जगताप यांनी त्यांचा ३८ हजार ४९८ मतांनी पराभव केला होता. तर, त्याअगोदरच्या विधानसभेला २०१४ मध्येही त्यांचा जगतापांनीच दारूण पराभव केला होता.

यावेळी ते सलग तिसऱ्यांदा विधानसभेला उभे आहेत. त्यामुळे त्यांची पराभवाची 'हॅटट्रिक' होणार की युती-आघाडीच्या भांडणात (राष्ट्रवादीचे नाना काटे (Nana Kate) आणि भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप Ashwini Jagtap) कलाटे यांची लॉटरी लागणार याकडे साऱ्या शहराचे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, कलाटेंना अतिआत्मविश्वास नडणार असल्याचीही चर्चा ऐकायला मिळत आहे.

२०१९ ला बंडखोरी केल्यानंतर कलाटे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. उलट पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) गटनेतेपदाची बक्षिसी दिली. त्यावेळी त्यांनी स्थायी समितीवर सदस्य म्हणून अश्विनी चिंचवडे यांची नियुक्ती करण्याची पक्षाची शिफारस डावलून ते स्वत:कडे घेतले. त्यानंतरही त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.

त्या दोन्ही घटना पक्षाशी निगडीत होत्या, म्हणून कारवाई करणे पक्षाने टाळले होते. यावेळची त्यांची बंडखोरी ही थेट आघाडीवर परिणाम करणारी आहे. त्यामुळे त्याची गंभीर दखल शिवसेना घेईल, असे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे कलाटेंसह त्यांना साथ देणारे चार नगरेसवक यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT