Laxman Jagtap
Laxman Jagtap Sarkarnama
पिंपरी चिंचवड

तुमची लायकी नाही तर येता कशाला?: जगतापांची पिंपरीतील रुग्णालयाबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : तुमची लायकी नाही, तर येता कशाला?असे हिणवून पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील धर्मादाय रुग्णालयात रुग्णांची लायकी काढण्यात येत असल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे आमदार आणि माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केला आहे. त्यामुळे गरीब रुग्णांची लूट, हीच का तुमची वैद्यकीय सुविधा, अशी विचारणा त्यांनी संबंधित रुग्णालयाला नाही, तर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच पत्र लिहून केली आहे. ( MLA Jagtap Complaint to Chief Minister about the Hospital in Pimpri)

भोसरीचे भाजपचे आमदार आणि शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केल्यानंतर पक्षाचे शहरातील दुसरे आमदार जगताप यांनीही राज्य सरकारवर तोफ डागण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी शहरातील आरोग्य प्रश्नाकडे लक्ष वेधीत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय. यापूर्वीही त्यांनी याच रुग्णालयावर आऱोप केले होते. महापालिका निवडणूक पाच महिन्यांवर आल्याने हे दोन्ही आमदार सध्या राज्य सरकारवर टीका करण्यात अधिक सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे. राज्यातील त्यांचे नेते राज्य सरकार व त्यातही शिवसेनेवर कडवट टीका करीत असताना त्यांचाच कित्ता पिंपरी-चिंचवडमध्येही त्यांचे आमदार गिरवू लागले आहेत.

धर्मादाय रुग्णालय असल्याने डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात गरीब रुग्णांवर सरकारच्या विविध योजनाअंतर्गत मोफत उपचार होणे कायद्याने बंधनकारक आहे. प्रत्यक्षात तेथे या रुग्णांना “तुमची लायकी नाही, तर येता कशाला”, अशा शब्दांत अपमानित केले जाते आहे, असा आरोप आमदार जगताप यांनी केला आहे. एवढेच नाही, तर तेथे खासगी रुग्णालय चालवले जाते आहे, असा दावाही त्यांनी केला. सरकारी सवलती लाटून रुग्णालय उभारायचे आणि रुग्ण हितापेक्षा धंदा करण्याचा हा सर्व प्रकार धक्कादायक आहे, असे ते म्हणाले.

त्याबद्दल गरीबांसाठी हीच का तुमची वैद्यकीय सुविधा?, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. या रुग्णालयाची चौकशी केल्यास अनेक धक्कादायक प्रकार समोर येतील. फक्त त्यासाठी शासनाने इच्छाशक्ती दाखवावी,असे आवाहन त्यांनी केले आहे. या रुग्णालयात आतापर्यंत किती रुग्णांवर शासकीय योजनाअंतर्गत मोफत उपचार झालेत, त्याची चौकशी आणि आतापर्यंतच्या सर्व वैद्यकीय बिलांची शासकीय यंत्रणेमार्फत लेखापरीक्षण करण्याची मागणी आमदार जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील धक्कादायक वास्तव सरकारला कळावे, यासाठी मी हा पत्रप्रपंच करत आहे, असे आमदार जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यात ते म्हणतात, हे रुग्णालय आपले कर्तव्य विसरून व्यवसाय करीत आहे. गरीब रुग्णांच्या भावना या रुग्णालय प्रशासनाला समजत नसून त्यांना उपचार देण्यात ते असमर्थ ठरले आहे.

तेथे आयसीयू बेडसाठी ५० हजार रुपये डिपॉझिट आणि आधीचे इमर्जन्सी वॉर्डमधील २४ हजार रुपये असे एकूण तब्बल ७४ हजार रुपये भरण्यास सांगितले जात आहे. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. शिकाऊ डॉक्टरच सर्व कारभार पाहतात. त्याचा परिणाम म्हणजे कोरोनाचा संसर्ग वाढलेल्या काळात या रुग्णालयात उपचारासाठी दाखल कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. हेच शिकाऊ डॉक्टर अतिदक्षता विभागातील गरीब रुग्णांना तुम्ही कोणत्याही शासकीय योजनेत बसत नाही, तुम्हाला उपचाराचे सर्व पैसे भरावे लागलीत, असे सांगतात. अशाप्रकारे गरीब रुग्णांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित ठेवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम करत आहे.

या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व त्यांचे सहकारी डॉक्टर व कर्मचारी गोरगरीब रुग्णांना उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यांच्याशी व त्यांच्या नातेवाईकांशी अतिशय गलिच्छ भाषेत बोलतात. तुमची लायकी नाही तर येता कशाला? अशा शब्दांत रुग्णांचा व त्यांच्या नातेवाईकांचा अपमान करतात. याबाबत अनेक रुग्णांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे या रुग्णालयाला शासकीय हिसका दाखवावा, अशी मागणीवजा अपेक्षा आमदार जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT