Shekhar Singh
Shekhar Singh  Sarkarnama
पिंपरी चिंचवड

पालिका आयुक्तांचा दणका; तीन कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri-Chinchwad News : वृक्षसंवर्धन आणि जतन करण्याच्या जबाबदारी असलेल्या उद्यान विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच वृक्षांची बेकायदा कत्तल केल्याची खळबळजनक घटना नुकतीच पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) घडली. या गंभीर घटनेची दखल घेत पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह (Shekhar Singh) यांनी उद्यान विभागाचे असिस्टंट हॉर्टीकल्चर सुपरवायझर आणि दोन उद्यान सहाय्यक (माळी) अशा तिघांना निलंबित केले. आता त्यांची विभागीय चौकशीही सुरु करण्यात आली आहे.

सातारा जिल्हाधिकारी पदावरून पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) आयुक्त म्हणून १८ ऑगस्टला रुजू झालेले शेखरसिंह यांची ही पहिलीच धडाकेबाज शिस्तभंगाची कारवाई आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. बेकायदा वृक्षतोड व छाटणी हे पालिका कर्मचाऱ्यांचै गैरवर्तन गंभीर असून त्यामुळे पालिकेची प्रतिमा जनमानसात मलिन झाली आहे. त्यांच्या या बेजबाबदार व सचोटीहिन कृत्यामुळे ते सेवेत राहिले, तर पुराव्यात फेरफार करतील, तपासात अडथळा आणतील म्हणून त्यांना निलंबित करण्यात येत आहे, असे आयुक्तांनी या संदर्भातील आदेशात म्हटले आहे.

संजीव प्रल्हाद राक्षे (सहाय्यक फळबाग पर्यवेक्षक), मच्छिंद्र नामदेव कडाळे आणि भरत रामभाऊ पारखी (दोघेही उद्यान सहाय्यक) अशी निलंबित करण्यात आलेल्या पालिकेच्या उद्यान विभागातील बेजबाबदार आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची नावे आहेत. त्यांनी शहरातील निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दत्तनगर, चिंचवड येथील महात्मा फुले उद्यानातील झाडे व काही झाडांच्या अनेक फांद्याची वरिष्ठांना न सांगता विनापरवाना कत्तल केली.

सावरकर उद्यानातील ग्लॅडीसिडीयाची तीन झाडे पूर्ण कापली. तर आठ कांचन वृक्षाच्या १४, चार कॅशिया झाड़ाच्या पाच फांद्या, स्पॅथेडिया वृक्षाची एक फांदी, तर फुले उद्यानातील काही झाडांसह १४ फायकल झाडाच्या ३१ फांद्या बेकायदा तोडल्या होत्या. त्याबाबत जागरूक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेतली. दिव्याखालील फांद्या तोडण्याची मागणी या तिघांकडे उद्यान सहाय्यकांनी केली होती. मात्र, त्याऐवजी त्यांनी फांद्यांबरोबर झाडेही विनापरवाना तोडली. तसेच ही तोड त्यांनी पालिकेमार्फत न करता खासगी यंत्रणेकरून केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT