NCP & Congress News
NCP & Congress News Sarkarnama
पिंपरी चिंचवड

NCP & Congress News : राष्ट्रवादीचा 'पुण्या'वर तर काँग्रेसचा 'मावळ'वर डोळा ? आघाडीत 'लोकसभे'वरुन दबावतंत्राचा दुसरा अंक?

सरकारनामा ब्यूरो

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad News : भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या पोटनिव़डणुकीवरुन राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. कुठल्याही क्षणी पुण्याची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील मूळच्या काँग्रेसच्या या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दावा ठोकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आता राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेवर दावा ठोकल्यानंतर आता मावळ लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसकडून दावा ठोकला आहे.

लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र, लोकसभेच्या निवडणुकांच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून दाव्या प्रतिदाव्यांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीने धुळे आणि पुणे य़ा कॉंग्रेसच्या जागांवर दावा केल्यानंतर कॉंग्रेसने आता राष्ट्रवादीच्या मावळच्या जागेवर क्लेम केला आहे.

गिरीश बापट(Girish Bapat) यांच्या अकाली निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. पण,ती होईल की नाही,याविषयी अनिश्चितता असतानाच त्यावरून दोन्ही कॉंग्रेसमध्ये तू तू- मै मै सुरु झाली आहे. बापट खासदार होईपर्यंत तिथे कॉंग्रेस निवडून येत होती. मात्र, त्यांचा आता तेथे सलग पराभव झाल्यानं यावेळी पोटनिवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीकडे घेण्याविषयी अजित पवार आग्रही आहेत.

त्यामुळे राष्ट्रवादी लढवत असलेल्या मावळवर आता कॉग्रेसने दावा ठोकला आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचा तेथे सलग तीनदा पराभव झाल्याचे कारण त्यांनीही दिले आहे. त्यातून दोन्ही कॉंग्रेसमध्ये प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीपूर्वीच जागावाटपाचा तिढा पुण्यातच नाही,तर आता मावळमध्येही उभा राहिला आहे. त्याजोडीने राष्ट्रवादीने धुळ्याच्या कॉंग्रेसच्याही जागेवर क्लेम ठोकल्याने जागावाटपातील चुरस वाढली आहे.

राष्ट्रवादी(NCP)नंतर कॉंग्रेसनेही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याचे काम मुंबईतील टिळक भवनात सुरु केले आहे. मावळ व शिरूर,रायगडचा आढावा तेथे घेण्यात आला. त्यावेळी उपस्थित पिंपरी-चिंचवडमधील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,अशोक चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मावळ यावेळी पक्षाकडे घ्या अशी मागणी केली.

कॉंग्रेस(Congress) चा परंपरांगत मतदारसंघ असलेल्या पुणे लोकसभेत पक्षाचा पराभव होत असल्याने त्यावर राष्ट्रवादी करीत असेल,तर मावळमध्येही त्यांचा सलग तिसऱ्यांदा पराभव झालेला आहे,याकडे कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष डॉ.कैलास कदम यांनी आपल्या नेत्यांचे लक्ष वेधले. शेकापबरोबर युती झाली तर पक्षाच्या उमेदवाराला आणखी ताकद मिळेल असे सांगत मावळमधून स्वत: तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पक्षाचे पनवेल अध्यक्ष महेंद्र घरत आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे निवडणूक लढवू शकतो असे त्यांनी सांगितले.

मतदारसंघात पक्षाचा एकही आमदार नाही वा पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकही सदस्य नाही, ही बाब यात अडसर ठरत नसून मोदी लाटेत कुणीही निवडून आले आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच महागाई,बेरोजगारीमुळे जनता त्रस्त असून ती भाजपविरोधात कौल देत आहे, हे कसबा विधानसभा पोटनिवडणूक आणि कर्नाटकच्या निवडणुकीतून दिसून आले आहे असेही ते म्हणाले.

पक्षाचे अस्तित्व टिकून ठेवून तो वाढविण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना ताकद मिळावी म्हणून मावळवर दावा केल्याचे टिळक भवनातील या आढावा बैठकीला उपस्थित असलेले कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबू नायर यांनी `सरकारनामा`ला सांगितले.

मावळ(Maval) लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या दोन जागांवरही त्यांनी या बैठकीत दावा ठोकला. मावळ लोकसभा मतदारसंघाअगोदरच्या खेड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व कॉंग्रेसचे प्रा. रामकृष्ण मोरे करत होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT