Shrirang Barne Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Shrirang Barne Big Statement : मावळ लोकसभेवर खासदार बारणेंचा दावा, २०२४ ला युतीचा उमेदवार म्हणून केली स्वत:च घोषणा

Maval News : '' भाजपची संघटना बांधणी सुरु असली,तरी उमेदवार हा शिवसेनेचाच...''

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chinchwad: आगामी लोकसभेसाठी शिरूरमध्ये युतीचा उमेदवार अद्याप निश्चित नाही.मात्र,मावळात तो ठरल्यात जमा आहे. तेथून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हेच उमेदवार असतील तशी घोषणा त्यांनी गुरुवारी(दि.१५) स्वत: केली. त्यासाठी भाजपच्या नेत्यांशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत विविध दाखले आणि लाभांचे वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे उद्या (दि .१६) पिंपरी-चिंचवडमध्ये थेरगाव येथे येत आहेत. त्याबाबत माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे (शिंदे) उपनेते आणि खासदार बारणेंनी मावळवर दावा ठोकला.

खासदार श्रीरंग बारणें(Shrirang Barne)नी मावळात आमचं (युतीचं) ठरलंय,तर आघाडीचं ठरायचंय असं म्हणत भाजपची संघटना बांधणी सुरु असली,तरी उमेदवार हा शिवसेनेचाच (शिंदे) असणार असल्याचे स्पष्ट केले. प्रतिस्पर्धी उमेदवार कोणीतरी असेल या शब्दांत त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. त्यांना गांभीर्याने घेणं टाळलं.त्यामुळे खासदारकीची त्यांची हॅट्रिक होणार का याकडं आता लक्ष लागलं आहे. तसेच मावळात भाजपकडून उमेदवार नसणार हे सुद्धा जवळपास स्पष्ट झालं आहे.फक्त आघाडीत राष्ट्रवादीनं मावळवर दावा केल्यानं त्यांचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता आहे.

पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी पिंपरी आणि चिंचवड हे दोन विधानसभा मतदारसंघ मावळ(Maval) मध्ये येतात. तर, भोसरी हा शिरूरमध्ये मोडतो. मावळच्या उलट स्थिती शिरूरमध्ये युतीची आहे. तेथे त्यांचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही.तेथून युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे (शिंदे) उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या नावाची फक्त चर्चा आहे.

दुसरीकडे आघाडीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांच्या उमेदवारीची घोषणा खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच केली.त्यानंतर खा. कोल्हे हे मतदारसंघात अधिक सक्रिय झाल्याचे फिरायला लागल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे तेथे त्यांचे प्रतिस्पर्धी आढळराव असणार का आणि मावळात बारणेंविरुद्ध आघाडीचे कोण असणार याचे औत्सुक्य आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT