PCMC News : Ajit Gavhane  Sarkarnama
पिंपरी चिंचवड

PCMC News : '...तर महापालिकाच आता खासगी तत्त्वावर चालवण्यास द्या,' ; असं का म्हणाले अजित गव्हाणे?

सरकारनामा ब्यूरो

PCMC News : पिंपरी चिंचवड महापालिकेने आपले जलशुद्धीकरण केंद्र खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर प्रशासन चालविणे जमत नसेल, तर आता महापालिकेचेच खासगीकरण करून ती ही चालवायला द्या, असा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांनी आज केला.

भाजप (BJP) नेत्यांचे ठेकेदार पोसण्यासाठी घेतलेला हा निर्णय अत्यंत गंभीर असून, नगरसेवक नसल्याचा गैरफायदा घेत मनमानी पद्धतीने प्रशासक तथा आय़ुक्त असे निर्णय घेत आहेत, असा आरोप गव्हाणेंनी केला. जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून खासगी ठेकेदार हा शहराला वेठीस धरू शकतो. त्याचा बेजबाबदारपणा आणि मनमानीचा फटका बसू शकतो. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटनाही घडू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

पिंपरी महापालिकेचे निगडी येथे सेक्टर क्रमांक २३ मध्ये जलशुद्धीकरण केंद्र आहे. पालिकेच्या स्थापनेपासून ते पाणीपुरवठा विभागाकडून चालविले जात आहे. मात्र, आता ते खासगी ठेकेदाराला चालविण्यास देण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला आहे. त्याला राष्ट्रवादीने कडाडून विरोध करीत तो रद्द करण्याची मागणी आज केली.

अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पाण्यासारख्या जीवनाश्यक विषयावर आयुक्तांनी शहरवासियांची मते जाणून घेणे गरजेचे, महत्त्वाचे होते. मात्र, पालिका ही स्वत:ची खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे ते निर्णय घेत आहेत, अशी टीकाही गव्हाणेंनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT